X : @Rav2Sachin

मुंबई : बेकायदेशीररित्या भरमसाठ दंड आकारण्यात येत असल्याच्या सुरक्षा रक्षकांच्या तक्रारीवरुन दि म्युनिसिपल युनियनने (The Municipal Union) औद्योगिक न्यायालयात धाव घेतली आहे.

सद्या मुंबई महापालिकेत सुरक्षा रक्षकांवर (Security guard) भरमसाठ दंड आकारण्यात येत असल्याने प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे. 

दाढी न करता कामावर येणे, बुटाची लेस सुटलेली असणे, ठरलेल्या सुरक्षा पॉईंटच्या ठिकाणी उपस्थित न राहणे, बुट फाटलेले असणे या सारख्या करणावरुन 3 ते 5 हजार रुपये दंड गेल्या वर्षभरापासून सुरक्षा रक्षकांना आकारण्यात येत आहे. 

मात्र सुरक्षा रक्षकांना आकारण्यात आलेला दंड हा बेकायदेशीर आहे, असे दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी ‘maharashtracity‘ शी बोलताना सांगितले.

सुरक्षा रक्षकांना जो दंड आकारण्यात येत आहे, तो कोणत्या नियमावलीच्या आधारावर आहे. तसेच दंड आकारताना कोणत्याही प्रकारची चौकशी पूर्ण न करता कोणत्या निष्कर्षाच्या आधारावर भरमसाठ दंड आकारला जात आहे, असे आम्ही प्रश्न उपस्थित करीत प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे आणि उपायुक्त किशोर गांधी यांची भेट घेऊन संबंधित प्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता, असे बने यांनी सांगितले. 

दरम्यानच्या काळात आमच्या तक्रारीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आम्ही सुरक्षा रक्षकांच्या तक्रारी वरुन दि म्युनिसिपल युनियनने औद्योगिक न्यायालयात (Industrial court) धाव घेतल्याचे बने यांनी सांगितले. 

याबाबत प्रमुख सुरक्षा अधिकारी अजित तावडे यांनी ‘maharashtracity‘ शी बोलताना सांगितले की, आम्ही कोणत्याही प्रकारचा भरमसाठ दंड आकारत नसून नियमानुसारच दंड आकारत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here