राज्यसभेसाठी काँग्रेसचा शिवसेनेवर दबाव

@vivekbhavsar

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेतील संख्याबळ वाढवण्याला प्राथमिकता देण्यापेक्षा राज्यसभेतील (Rajya Sabha) बलाबल वाढवण्यावर अधिक लक्ष केंद्रित केलेल्या भारतीय जनता पक्ष (BJP) आणि काँग्रेससाठी (Congress) राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपने तिसरा उमेदवार दिल्याने आणि अतिरिक्त १० मतांची बेगमी केल्याने काँग्रेसचा उमेदवार अडचणीत आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरून शिवसेनेवर (Shiv Sena) एका उमेदवाराची माघार घेण्यासाठी दबाव वाढला आहे.

काँग्रेसच्या दिल्लीतील वर्तुळातून मिळालेल्या माहितीनुसार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या निकटवर्तीयाकडून शिवसेना नेत्यांशी संपर्क साधला गेला असून वाटाघाटी सुरू आहेत. सेनेने माघार घ्यावी या काँग्रेसच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) अजून अनुकूल नाहीत. मात्र, काँग्रेसकडून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहेत.

Also Read: प्रशासनावर पकड नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामाच द्यावा!

भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाचे पियूष गोयल (Piyush Goyal) आणि डॉ अनिल बोंडे (Dr Anil Bonde) हे दोन उमेदवार सहज निवडून आल्यानंतर धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) या तिसऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ज्या १० मतांची गरज आहे, त्याची बेगमी झाली आहे.

२८८ सदस्यांच्या विधान सभेत शिवसेनेचे रमेश लटके यांचे निधन झाल्याने २८७ सदस्य मतदानास पात्र आहेत. त्यापैकी अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) हे दोन सदस्य कारागृहात असल्याने त्यांना मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) न्यायालयात गेली आहे. यापूर्वी रमेश कदम या कैदी सदस्याला मतदानासाठी परवानगी देण्यात आली होती. हाच न्याय देशमुख आणि मलिक यांना देण्यात येईल, असा राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वास आहे.

राज्यसभा निवडणूक जिंकण्यासाठी ४२ चा कोटा आहे. भाजपकडे १०६ सदस्य आहेत. त्यांच्या समर्थक अपक्षांची गोळाबेरीज केली तरी तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला १० मतांची गरज आहे. त्याची व्यवस्था झाल्याने भाजपचा तिसरा उमेदवार निवडून येणार आहे, असा विश्वास भाजप सूत्राने व्यक्त केला.

तर काँग्रेसकडील मतांची बेरीज ४२.८ होत आहे. एका आमदाराचे मत कमी पडले तरी काँग्रेसचा उमेदवार पडू शकेल. हीच भीती असल्याने काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला तरी महाविकास आघाडी सरकारच्या (MVA) स्थैर्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. मात्र, काँग्रेसची प्रतिष्ठा धुळीस मिळण्यासोबतच पक्षाची राज्यसभेतील ताकद एका सदस्याने घटणार आहे. याचसाठी राहुल गांधी यांच्या निकटवर्तियाकडून उध्दव ठाकरे यांचे माघारीसाठी मन वळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेस सूत्रांनी सांगितले.

या घडामोडीत भाजपकडून बिगर राजकीय व्यक्ती वाटाघाटी करत असल्याचे समजते.

भाजपसाठी राज्यसभेतील पक्षाचे संख्याबळ वाढवण्यास प्राधान्य दिले जात आहे. म्हणूनच महाराष्ट्रातून (Maharashtra) तिसरा उमेदवार दिला गेला आहे. सेनेने एक उमेदवार मागे घेतला तर विधान परिषद निवडणूक देखील बिनविरोध केली जाईल, असा निरोप भाजपकडून देण्यात आला आहे.

विधान परिषदेत संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार सहज निवडून येणार आहेत. त्यामुळे त्या अर्थाने भाजपला परिषद निवडणूक तशी फार महत्वाची नाही. परिषद निवडणुक गुप्त मतदान (secret ballot) पद्धतीने घेतली जाते. आता राज्यसभेसाठी माहाविकास आघाडी सरकारने माघार घेतली नाही, तर विधान परिषद निवडणुकीत भाजपा त्यांचा पाचवा उमेदवार देवून मते फोडू शकते, असा दावा भाजपने केला आहे.

Also Read: विधापरिषद निवडणूक : दोन जागा भाजपकडून निष्ठावंतांना

दरम्यान, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले की सेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येतील. अपक्ष आणि घटक पक्ष सेनेच्या संपर्कात आहेत. आमदारांना मतदारसंघातील कामे होणे महत्वाचे असते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कामे करीत असल्याने अपक्ष आमदार त्यांच्यावर खुश आहेत.

सभागृहात एकमेकावर तुटून पडत असले तरी उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील वैयक्तिक सबंध अजूनही चांगले असल्याचा दावा या नेत्याने केला. उद्या (दि ३ जून) रोजी दुपारी ३ वाजेर्यंत माघारीची वेळ आहे. तोपर्यंत काय होते ते बघा, असे या नेत्याने सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या आज झालेल्या बैठकीत पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी अतिरिक्त ११ मते सेना उमेदवार संजय पवार यांना देण्याच्या सूचना दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here