X : @milindmane70

महाड – मागील वर्षी सह्याद्रीच्या पर्वतरांगात मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम महाबळेश्वर रस्त्यावर होऊन कोल्हापूर घाटात दरड कोसळली होती. परिणामी अनेक दिवस या मार्गे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचीच पुनरावृत्ती चालू वर्षी घडण्याची शक्यता अनेक वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. आज सकाळी या मार्गावर दरड कोसळून एका मार्गाची वाहतूक बंद झाली होती. दरड हटवल्याने पुन्हा हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला.

सातारा व रायगड जिल्ह्याला जोडणारा महाबळेश्वर घाट हा रायगड जिल्ह्यातील रहिवाशांना एकमेव रस्ता आहे. दरवर्षी या घाटात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळून वाहतूक कोणत्याही क्षणी बंद पडते. मागील वर्षी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी झाल्याने त्याचा परिणाम महाबळेश्वर – महाड रस्त्यावर झाला होता. महाबळेश्वर व पोलादपूर घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होऊन डोंगरावरील माती व दगड गोटे रस्त्यावर आल्याने हा मार्ग अनिश्चित काळासाठी बंद झाला होता. मात्र त्यानंतर या रस्त्यावरील आलेले डोंगरावरील मोठे दगड व माती बाजूला करून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला, तर काही धोकादायक ठिकाणी पुन्हा डोंगरावरील माती येऊ नये यासाठी संरक्षक भिंती, गॅबियन वॉल अशी कामे करण्यात आली. मात्र ही कामे करून देखील त्या – त्या ठिकाणी पुन्हा दरड कशी कोसळते, हा संशोधनाचा विषय ठरला आहे.

पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावर आज सकाळी दरड कोसळल्यानंतर त्या ठिकाणी एकेरी वाहतूक चालू होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविण्यात आल्यानंतर त्या ठिकाणावरून दगड काढून वाहतूक पूर्ववत करण्यात आली, मात्र पोलादपूर व महाबळेश्वर पट्ट्यात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण जास्त असल्याने व डोंगर उतार मोठ्या प्रमाणावर असल्याने पाण्याच्या प्रवाहाने पुन्हा माती व दगड खाली येण्याचे सत्र चालूच आहे.

दरड कोसळणे म्हणजे पैसाच कमवणे

पोलादपूर – महाबळेश्वर घाटात दरवर्षी दरड कोसळणे म्हणजे पावसाच्या पाण्यासारखा पैशात कमावणे हेच उद्दिष्ट सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांमध्ये व ठेकेदारांमध्ये असल्याची चर्चा असते. या घाटातील रस्त्यावरील पावसाळ्यात आलेले दगड, गोटे व माती काढणे ही कामे ठराविक ठेकेदारांना कशी मिळतात, हा देखील संशोधनाचा विषय ठरला आहे. केवळ सोपस्कार पार पाडावे तशाच पद्धतीने या घाटातील कामे केली जातात. अधिकाऱ्यांना टक्केवारी दिली की आपला मार्ग मोकळा, असा समज ठेकेदारांचा झाला असल्याने व अधिकाऱ्यांना देखील टक्केवारीची लागण लागली असल्याने या पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारे अधिकारी व शाखा अभियंता येथून हलायचेच नाव घेत नाहीत. पैसा मात्र शासनाचा वाया जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागातल्या झारीतले शुक्राचार्य यांचे डोळे कधी उघडणार? असा सवाल या महामार्गावरून जाणारे असंख्य वाहन चालक शासनाला करीत आहेत.

पावसाळ्यापूर्वीची कामे पावसाळ्यातच

पोलादपूर – महाबळेश्वर रस्त्यावरील गटारात आलेली माती व दगड गोटे साफ करण्याचे काम पावसाळ्यापूर्वी करावयाचे असताना ते पावसाळ्यातच चालू असल्याचे चित्र घाटात पाहण्यास मिळत आहे. एक डंपर एक जेसीबी या यंत्रणेमार्फत या रस्त्यावरील गटार काढण्याचे काम भर पावसाळ्यात चालू आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे पोलादपूरचे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत का, असा सवाल या परिसरातील जनता राज्य शासनाला विचारत आहे.

पोलादपूर – महाबळेश्वर घाटात सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर अंतर्गत मागील पाच वर्षात झालेल्या पोलादपूर – महाबळेश्वर घाटातील कामांची श्वेतपत्रिका काढली तर किती बोगस कामे झाली आहेत व यातून खिसे कोणाचे भरले आहेत, हे उघड होऊ शकते. मात्र तेरी भी चूप मेरी भी चूप अशा पद्धतीने ठेकेदार पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभाग काम करीत असल्याने कारवाई कोणी कोणावर करायची असा प्रश्न उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here