X : @Rav2Sachin
मुंबई : नायर, केईएम, सायन रुग्णालयातील (Sion Hospital) परिचारिका (duties of nurses) संवर्गाच्या ड्युटी पॅटर्नमध्ये बदल करण्याचा आणि साप्ताहिक सुट्ट्या कमी करण्याचा महापालिका (BMC) प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाला कामगार संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. तर परिचारिकांनी आज सोमवारपासून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र रुग्णसेवेवर विपरित परिणाम होऊ नये, म्हणून तुर्तास आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने एकतर्फी वेगळा ड्युटी पॅटर्न राबवण्याचा, परिचारिका संवर्गाच्या साप्ताहिक सुट्या कमी करण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेऊन रद्दबातल करावा. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे आज म्युनिसिपल मजदूर युनियन कार्यालय येथे परिचारिका संवर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कामगार संघटनेच्या बैठकीत ठरले.
म्युनिसिपल मजदूर युनियन (Municipal Mazdoor Union) कार्यालय येथे परिचारिका संवर्गाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व कामगार संघटनांची बैठक आज सोमवार दुपारी पार पाडली. बैठकीमध्ये प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाचा निषेध करण्यात आला. परिचारिका संवर्गाला सध्या सुरू असलेला आणि त्यांच्या सेवाशर्तीचा भाग असलेला ड्युटी पॅटर्न लागू असलाच पाहिजे, याबाबत सर्व कामगार संघटनांचे एकमत झाले.
प्रशासनाच्या एकतर्फी निर्णयाला न जुमानता सर्व परिचारिकानी सद्या सुरू असलेल्या ड्युटी पॅटर्न मध्येच नायर, सायन, केईएम रुग्णालयांमध्ये सेवा देतील, असे बैठकीत ठरविण्यात आले. यामध्ये प्रशासनाने अतिरेकी भूमिका घेऊन जबरदस्तीने निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास किंवा परिचारिकांवर शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारल्यास या तीनही रुग्णालयातील परिचारिका त्याच क्षणी तीव्र आंदोलन करतील. तसे झाल्यास त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.
मुंबईकर नागरिकांना त्रास होऊ नये, या भूमिकेतून सध्या कोणतेही तीव्र आंदोलन न करण्याचा निर्णय सर्व कामगार संघटनांनी घेतलेला आहे. प्रशासन बळजबरी करणार असेल तर मात्र सर्व कामगार संघटनांसमोर तीव्र आंदोलनाशिवाय कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही, असेही यावेळी कमगार संघटनांनी जाहीर केले आहे.
महापालिका प्रशासनाने एकतर्फी वेगळा ड्युटी पॅटर्न राबवण्याचा, परिचारिका संवर्गाच्या साप्ताहिक सुट्या कमी करण्याचा घेतलेला एकतर्फी निर्णय मागे घेऊन रद्दबातल करावा, असे आवाहन सर्व कामगार संघटनांनी केले आहे.
या बैठकीमत दि म्युनिसिपल युनियनचे पदाधिकारी रमाकांत बने, रंगनाथ सातवसे आणि म्युनिसिपल नर्सिंग अँड पॅरामेडिकल स्टाफ युनियनच्या पदाधिकारी त्रिशीला कांबळे, रंजना आठवले तसेच म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनाच्या पदाधिकारी ॲड.रचना अग्रवाल व नोबल नर्सिंग युनियनच्या कल्पना गजूला उपस्थित होत्या.