X : @maharashtracity

मुंबईतील नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत (rainy season) कोणत्याही गैरसोयींना सामोरे जावे लागू नये म्हणून खड्डेमुक्त रस्त्यांचे उद्दिष्ट ठेवून महानगरपालिका (BMC) प्रशासन अविरत कार्यरत आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारितील सर्व रस्ते वाहतूकयोग्य आणि सुरक्षित स्थितीत ठेवण्यासाठी बारकाईने नियोजन करण्यात आले आहे. रस्ते डागडुजी, खड्डे भरण्याची कामे प्रगतिपथावर असून एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंते नियुक्त करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर, सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा (Geopolymer technology) प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यासह वाहतूक योग्य सुरक्षित स्थितीत आणण्याचे निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच नियमितपणे रस्ते कामांचा, रस्ते वाहतुकीचा आढावा घेत देण्यात आलेले आहेत.

रस्ते डागडुजी, खड्डे भरण्याची कामे प्रगतिपथावर

यावर्षी पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी व पावसाळ्यात खड्डे (reparing of potholes) भरण्यासाठी महानगरपालिकेने परिमंडळनिहाय एकूण १४ निविदा मागविल्या. ही कामे प्रगतिपथावर आहेत. यापैकी ९ मीटरपर्यंतच्या रुंद रस्त्यांची कामे विभागीय पातळीवर करण्यात येत आहेत. तर, ९ मीटरपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांची कामे रस्ते विभागाच्या मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येत आहेत. तसेच पूर्व द्रुतगती महामार्ग व पश्चिम द्रुतगती मार्गासाठी प्रत्येकी दोन निविदा मागविण्यात आल्या असून ही कामे प्रगतिपथावर आहेत.

एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंत्यांची नेमणूक

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील एकूण २२७ बीटसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे दुय्यम अभियंत्याची नेमणूक करण्यात आली आहे. या दुय्यम अभियंत्यांनी नेमून दिलेल्या विभागात दररोज रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे आढळल्यास ते तात्काळ बुजवण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत. पावसाळ्या दरम्यान रस्ते सुस्थितीत राहावेत, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पावसाळापूर्व कामे हाती घेऊन दुरूस्‍तीयोग्‍य रस्त्यांची डागडुजी केली आहे. मात्र, तरीदेखील पावसामुळे रस्त्यांवर जर खड्डे आढळले तर ते विनाविलंब बुजवावेत, यासाठी महानगरपालिकेचे अभियंते स्वतःहून सक्रियपणे (प्रोॲक्टिवली) खड्डे शोधून काढत असून ते २४ तासात बुजविण्‍याची कार्यवाही करत आहेत.

सिमेंट कॉंक्रिट रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर

मुंबईतील रस्त्यांवर पावसाळ्यामुळे होणारे खड्डे भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने नवीन व प्रगत अभियांत्रिकी पद्धतींचा प्रायोगिक तत्त्वावर अवलंब केला आहे. द्रुतगती मार्गावरील दुरुस्तीयोग्य सिमेंट कॉंक्रिट रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी जिओ-पॉलिमर तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रिटचा रस्ता खराब झाला असेल तर संपूर्ण पृष्ठभाग न काढता खड्ड्यामध्ये जिओ पॉलिमर काँक्रिट भरले जाते आणि ते मूळ सिमेंट काँक्रिट समवेत एकजीव होते. विशेष म्हणजे या पद्धतीने खड्डे भरल्यानंतर अवघ्या २ तासात रस्ता वाहतुकीसाठी खुला करता येवू शकतो. तर, डांबरी रस्त्याच्या पृष्ठभागांवर आवरण टाकून रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी ‘मायक्रो-सर्फेसिंग’ या नवीन तंत्रज्ञानाचा प्रायोगिक तत्वावर वापर करण्यात येत आहे. प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे संबंधित कंत्रादारांकडून विनाशुल्क भरून घेण्यात येत आहेत, जेणेकरून रस्ते वाहतूक योग्य होण्यास मदत होत आहे.

रस्ते कामे सुरू करण्यास लागतो निर्धारित कालावधीपेक्षा अधिकचा कालावधी

रस्ते कामांसाठी मुंबई वाहतूक पोलीस विभागामार्फत टप्प्या-टप्प्याने परवानगी देण्यात येते. त्यामुळे कामे सुरू होण्यास मर्यादा येतात. मुंबई महानगरात अनेक उपयोगिता सेवा-सुविधांचे भूमिगत जाळे असून उपयोगिता सेवांच्या वाहिन्यांची दुरुस्ती किंवा स्थलांतरण करावे लागते. तसेच, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या, पर्जन्यजल वाहिन्या यांची दुरुस्ती, स्थलांतरण, विस्तारीकरण आदी कामे केली जातात. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा प्रत्यक्ष रस्ते कामे सुरू करण्यास अधिक कालावधी लागतो.

मुंबई महानगरात अवजड वाहनांना दिवसा प्रवेशबंदी असल्याने रस्ते कामासाठी आवश्यक सामग्री वेळेवर उपलब्ध होत नाही. मुंबईतील रस्त्यांवर दिवसभर वाहनांची वर्दळ असल्याने रस्ते वाहतुकीस अडथळा येऊ नये तसेच नागरिकांना त्रास होऊ नये, याकरिता रस्त्यांची कामे रात्री करावी लागतात. त्यामुळे प्रसंगी रस्त्यांची कामे जलद गतीने करता येणे शक्य होत नाही.

कामे करण्यास विलंब झाल्यास कंत्राटदारांवर नियमानुसार केली जाते कारवाई

कंत्राटदारांकडून रस्ते विषयक कामे करण्यास विलंब झाल्यास निविदेच्या अटी व शर्तीनुसार कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येते. शहर विभागातील कंत्राटदार मेसर्स रोडवेज सोल्यूशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड यांनी रस्त्याची कामे वेळेत सुरु केली नाहीत. परिणामी त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. एवढेच नव्हे तर कंत्राटदाराची ३० कोटी २६ लाख ५६ हजार ६०० रुपयांची कंत्राट सुरक्षा रक्कम आणि १ कोटी २३ लाख ३१ हजार २०० रुपयांची कंत्राट अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच, कंत्राटदारांकडून ६४ कोटी ६० लाख ८७ हजार ४३९ रुपयांचा दंड वसूल करण्याबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लवादाकडे सुनावणी सुरू आहे. लवादाच्या आदेशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

शहर विभागातील पहिल्या टप्प्यातील रद्द केलेल्या कंत्राटाऐवजी २०८ रस्त्यांची नवीन निविदा मागविण्यात आली आहे. पावसाळ्यानंतर कार्यादेश देऊन ही कामे सुरू करण्यात येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here