@maharashtracity

मुंबई: कोरोनाला रोखण्यासाठी अद्याप ठोस औषध उपलब्ध झालेले नाही. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीचा डोस नागरिकांना देण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुंबईतील सर्व पालिका, सरकारी लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. (Vaccination to women only) त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेने (BMC) १६ जानेवारीपासून मुंबईत लसीकरण मोहीम हाती घेतली. तेव्हापासून ते आजपर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंट लाईन वर्कर, ६० वर्षीय नागरीक, ४५ – ५८ वयोगट, १८ – ४४ वयोगट, स्तनदा माता , गर्भवती महिला, विदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी, अंथरुणावर खिळून असलेले आजारी, दिव्यांग व्यक्ती आदींना लसीचे डोस देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.

महिलांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी समाजातून केली जात होती. त्याची दखल घेऊन आता पालिकेकडून सरकारी, पालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी १७ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी, महिलांना लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे. महिलांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन न करता थेट लसीकरण केंद्रावर येवून लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या विशेष लसीकरण सत्राच्या कारणाने १७ सप्टेंबर रोजी ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here