@maharashtracity

मुंबई: चेंबूर, भांडुप, विक्रोळी येथे दरड, भिंत, घर कोसळून ३० जणांचा बळी गेल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी ४.३० वाजेच्या सुमारास गोवंडी (Gowandi) येथे तीन मजली इमारतवजा घर कोसळून झालेल्या दुर्घटनेत १० जण जखमी झाले. त्यापैकी गंभीर जखमी मोकर शबीर शेख (८०) व नेहा परवेझ शेख (३५/ महिला), शमशाद शेख (४५/महिला) तिघांचा मृत्यू झाला. तर ७ जखमींवर सायन, राजावाडी या रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते.  

या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा इमारत, घरे, दरड दुर्घटना यांची समस्या ऐरणीवर आली आहे.

     

प्राप्त माहितीनुसार, गोवंडी, शिवाजी नगर, बॉम्बे सिटी रुग्णालय, प्लॉट क्रमांक -३ येथे तीन मजली इमारतवजा घर शुक्रवारी सकाळी ४.३० वाजेच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अचानक कोसळले. त्यामुळे मोठा आवाज झाला. 

आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घर कोसळून निर्माण झालेल्या ढिगाऱ्यात शेख व कुरेशी कुटुंबीय अडकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

स्थानिकांनी पोलीस, अग्निशमन दल ब पालिका कर्मचारी यांची मदत येण्यापूर्वीच आपल्यापरीने बचावकार्य सुरू केलं. 

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान व वार्ड स्तरावरील कामगार यांनी घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केलं.   

 यावेळी, १० जणांना ढिगाऱ्यामधून कसेबसे बाहेर काढून त्यांना तात्काळ नजीकच्या राजावाडी व सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या जखमींपैकी गंभीर जखमी मोकर शबीर शेख (८०) व नेहा परवेझ शेख (३५/ महिला) , शमशाद शेख (४५/महिला) तिघांचा मृत्यू झाला.    तर , मोहम्मद फैजल कुरेशी (२१), नम्रा कुरेशी (१७/ महिला), शाहिना कुरेशी (२६/ महिला) या तिघांवर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. 

 त्याचप्रमाणे, राजावाडी रुग्णालयात परवेझ शेख (५०), अमीनाबी शेख (६०/महिला), अमोल धाडे ( ३८), समोल सिंह (२५) या चार जणांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here