@maharashtracity

दोघांची प्रकृती गंभीर

मुंबई: वरळी येथील बीडीडी चाळीतील (BDD chawl) एका घरात सकाळच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत पुरी कुटुंबियातील ४ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नायर रुग्णालयात (Nair Hospital) उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, वरळी, गणपतराव जाधव मार्ग येथील बीडीडी चाळ क्रमांक ३ मध्ये राहणारे आनंद पुरी यांच्या घरात मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला (Blast of gas cylinder). या स्फोटाने संपूर्ण चाळ हादरली.

गॅस सिलेंडर स्फोटाच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांनी सावधानता बाळगत घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. या गॅस सिलिंडरच्या स्फोटात आनंद पुरी (२७) आणि मंगेश पुरी (४ महिने) हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर विद्या पुरी (२५) आणि विष्णू पुरी (५) हे दोघेजण जखमी असले तरी त्यांची प्रकृती स्थिर आहे. या चौघांवर महापालिकेच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व मदतकार्य सुरू केले. सदर घटना का व कशी घडली याबाबत तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here