@maharashtracity

६ जण बरे होऊन घरी परतले

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या (BEST Undertaking) ६६ कर्मचारी, अधिकारी यांना गेल्या २७ डिसेंबरपासून ते आजपर्यंत कोविडची (covid) लागण झाल्याचे माहिती समोर आली आहे. या ६६ पैकी ६ कर्मचारी वेळीच योग्य उपचार घेतल्याने कोविडमुक्त होऊन घरी परतले आहेत. उर्वरित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या ६६ जणांमध्ये बेस्टच्या परिवहन विभागाअंतर्गत बस सेवा देणारे बस चालक (bus drivers), वाहक (bus conductors), वीज कर्मचारी (wiremen), अधिकारी यांचा समावेश असल्याचे समजते.

या वृत्ताला बेस्ट प्रशासनाने दुजोरा दिला आहे. मात्र आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्याने बेस्टच्या इतर हजारो कर्मचारी व त्यांची काळजी करणारे नातेवाईक यांच्यात काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यापूर्वी, गेल्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत बेस्टमध्ये कार्यरत ३३ हजार अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी ३ हजार ५६१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र यशस्वी उपचारानंतर ३ हजार ४३५ अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोना नियमांचे पालन करून यशस्वीपणे मात केली होती.

तर ९७ कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी दोन हात करताना दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिकेकडून (BMC) ५० कोटी रुपये घेऊन खरे कोरोनायोद्धा (corona warriors) ठरलेल्या ९७ अधिकारी, कर्मचारी यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. तर ‘बेस्ट’ने ७८ मृत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना नोकऱ्या दिल्या आहेत.

मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत बेस्ट उपक्रमाच्या परिवहन (transport) आणि वीज विभागामार्फत (electric department) मुंबईकरांना बस सेवा व विद्युत सेवा अविरतपणे देण्यासाठी बेस्टचे कर्मचारी व अधिकारी हे आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.

मुंबईत मे २०२० मध्ये कोविडचा प्रादुर्भाव खूपच वाढला होता. त्यावेळी सामान्य नागरिकांना लोकल ट्रेनमधून प्रवास (local train journey) करण्यास मनाई करण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्यास परवानगी होती.

त्यावेळी बेस्ट परिवहन विभागाची बस सेवा सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून आली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना बेस्ट बसचा प्रवास खूप मोठा आधार बनली होती. आजही कोविडचे दोन डोस न घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनचा प्रवास करण्यास मनाई आहे. त्यामुळे अशा नागरिकांना आजही बेस्ट बसचा प्रवास हाच आधार आहे.

मुंबई शहर भागात बेस्ट वीज विभागाकडून वीज पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे बेस्टच्या वीज विभागातील कर्मचाऱ्यांना वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास झोपडपट्टी, सोसायटी, संकुल अशा ठिकाणी भेट देऊन दुरुस्तीची कामे करून वीज पुरवठा सुरळीत करावा लागतो.

बेस्टच्या वीज व परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचा बाहेरील नागरिकांशी संपर्क येत असल्याने साहजिकच त्यांना कोविड बाधितांमुळे कोविडची लागण होऊन ते कोविडबाधित ठरतात. त्यामुळे त्यांना बेस्ट प्रशासनाकडून तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते.

यशस्वी उपचारानंतर कोविड मुक्त अधिकारी, कर्मचारी यांना घरी पाठवले जाते. मात्र ज्यांची प्रतिकार शक्ती कमी पडते, ज्यांना इतर मोठे आजार असतील तर अशा परिस्थितीत ते उपचाराला कमी प्रतिसाद देतात व त्यामुळे त्यातच त्यांना मृत्यू ओढवण्याची शक्यता जास्त असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here