मुंबईत २३६ नगरसेवक

काँग्रेसचे समर्थन तर भाजपचा विरोध

@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रीमंडळाने मुंबईतील वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ एवढे वाढविण्याचा म्हणजे ९ नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयाचे पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी स्वागत केले आहे. तर भाजपचे (BJP) प्रवक्ते भालचंद्र शिरसाट (Bhalchandra Shirsat) यांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे. निवडणुकीतील संभाव्य पराभवाच्या भितीनेच सत्ताधारी शिवसेनेने (Shiv Sena) हा निर्णय राजकीय हेतूने घेतला आहे, अशी टीकाही शिरसाट यांनी केली आहे.

त्यामुळे आता राज्यातील शिवसेना, काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सरकारच्या या निर्णयाचे पडसाद अवघ्या काही कालावधीतच राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. या निर्णयावरून भाजपला महाविकास आघाडी सरकार विरोधात रान उठविण्यासाठी आणखीन एक मुद्दा मिळाला आहे. या निर्णयाला कायदेशीर आव्हान दिले गेल्यास निवडणूक प्रक्रिया लांबण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचे समर्थन -: रवी राजा

राज्यात सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचे सरकार (MVA government) आहे. तर मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पालिकेत काँग्रेस विरोधी पक्ष आहे. तर राज्यात सत्तेत सहभागी आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने मुंबईत आणखीन ९ वार्ड वाढविण्याबाबत म्हणजेच आणखीन ९ नगरसेवक वाढविण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे आम्ही काँग्रेस पक्षामार्फत स्वागत करतो व त्यास समर्थन देतो, असे पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

रवी राजा पुढे म्हणाले की, या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. तसेच, या निर्णयाचा फायदा हा आम्ही राज्यात सत्तेवर असल्याने महाविकास आघाडीलाच होणार किंवा पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेलाच होणार, असे काही नाही. कारण की, निवडणुकीत मतदार हे विकास कामे बघूनच मतदान करतात.

दुसरे म्हणजे मुंबईत काही वार्डात २० हजार तर काही वार्डात ७० हजार लोकसंख्या आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होत आहे. नगरसेवकांना कामे करताना बऱ्याचदा अडचणी येत असतात. मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता वार्ड व नगरसेवक संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आलेला असावा. त्यामुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होऊन विकास कामे अधिक चांगल्या गतीने होतील, असे रवी राजा यांनी सांगितले.

आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक नगरसेवक विजयी होतील व पुढील महापौर हा काँग्रेसच्या मदतीशिवाय होऊ शकणार नाही, असा दावा रवी राजा यांनी केला आहे.

राजकीय फायद्यासाठी निर्णय – भाजप

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सत्ताधारी शिवसेनेने पराभवाच्या भीतीने मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या ९ ने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सरकारने फक्त ९ नगरसेवकच का वाढवले, नगरसेवकांची संख्या वाढवण्याला लोकसंख्येचा किंवा जणगणनेचा आधार आहे का, असे सवाल उपस्थित करीत भाजपचे नामनिर्देशित सदस्य व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी विरोध दर्शविला आहे.

केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हा निर्णय शिवसेनेने घेतला आहे, असा आरोपही भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

वास्तविक, यापूर्वी राज्यातील महापालिकांमधील १५ टक्के जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महापालिकेतील जागा वाढविण्याबाबतचा निर्णय घेतला नव्हता. खरे तर त्यावेळीही नगरसेवक संख्या अथवा वार्डाची संख्या वाढविण्याचा निर्णय सरकारला घेता आला असता.

मात्र, त्यावेळी या जागा वाढवल्या नाहीत. प्रभाग रचनेत बदल करून निवडणूक जिंकू, असा डाव असून तो यशस्वी होणार नाही, हे लक्षात आल्यावर प्रभागांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रभाग रचना करण्यास आपल्याला मोकळं रान मिळेल या राजकीय हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप भालचंद्र शिरसाट यांनी केला आहे.

ते निवडणुकीला घाबरले आहेत असा आरोप करून शिरसाट म्हणाले, देशात जनगणना झाली नसताना लोकसंख्या कुठे वाढली, कुठे वॉर्ड वाढणार कुठे कमी होणार हे सरकारने सांगितलेले नाही. प्रशासनाला हाताशी धरून असुरक्षितता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांना पराभव नजरेसमोर दिसू लागला आहे. यासाठी ही नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे.

ज्या पद्धतीने कामकाज सुरु आहे, हे पाहता मुंबईकरांच्या मनात एक वेगळा संदेश गेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here