@maharashtracity

मुंबई: सध्या मुंबई महापालिकेत चिटणीसपदावरून सत्ताधारी शिवसेना – भाजप यांच्यातील वाद चांगलाच गाजत आहे. पालिका सेवाज्येष्ठता पद्धती नसल्यानेच हे वाद चव्हाट्यावर येत आहेत. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत चिटणीस विभागासाठी सेवा जेष्ठतेबाबतचे धोरण तयार करण्यात आले. (BMC approved Seniority policy)

यासंदर्भातील प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीला आला असता भाजपने केलेल्या विरोधाला न जुमानता, मराठी – अमराठीवरून झालेल्या गदारोळातच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing committee Chairman Yashwant Jadhav) यांनी या प्रस्तावावर मतदान घेऊन तो बहुमताने मंजूर केला.

पालिका चिटणीस खात्यात चिटणीस पदावरून मराठी – अमराठी वाद होत असे. मात्र आज चिटणीस खात्यातील सेवा जेष्ठतेबाबत धोरण मंजूर करण्यात आले आहे. त्यानुसार दोन वेगळे विभाग न करता एकाच विभाग असावा.

पदोन्नतीसाठी एकत्र यादी बनवावी याला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, पदोन्नती देण्यासाठी परिक्षा पास झालेला दिनांक, परिक्षा एकाच दिवशी पास झाले असल्यास कामाला लागलेला दिनांक पाहावा, कामाला लागल्याचा एकच दिनांक असेल तर जन्म तारिख पाहावी असे धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे चिटणीस खात्यात पदोन्नतीचे वाद होणार नाहीत.

या धोरणामुळे पालिका चिटणीसपदी नियुक्ती करताना कुणावरही अन्याय होणार नाही. तसेच, कोणत्याही प्रकारचा गदारोळ, गोंधळही निर्माण होणार नाही. पण जे सध्या या पदावर आहेत त्यांची पदावनती होणार नाही.

याची अंमलबजावणी कधीपासून करायची याबाबतचा प्रस्तावही स्थायी समिती सभेत मंजुरीसाठी येईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

वास्तविक, मुंबई महापालिकेचा चिटणीस विभाग १८७२ पासून कार्यरत आहे. त्यानंतर मराठी आणि इंग्रजी (सर्वसाधारण व अनुवादित) असे दोन विभाग झाले. त्यामुळे कुठल्या विभागाचा चिटणीस सेवाजेष्ठतेनुसार निवडावा, अशी कठीण परिस्थिती निर्माण होत असे.

यास्तव, २४ फेंब्रुवारी २००८ रोजी एका ठरावाच्या माध्यमातून हे दोन्ही विभाग एकत्र करून १०० टक्के मराठीचा कारभार करण्यात आला. त्याच वेळी सेवाजेष्ठतेबाबतचे धोरण तयार होणे आवश्यक होते. पण चिटणीस पद नेमताना नेहमी होणारे वाद थांबत नव्हते. त्यामुळे हा सेवाजेष्ठतेबाबतचा प्रस्ताव काल स्थायी समितीमध्ये मंजुर करण्यात आला, असे यशवंत जाधव यांनी सांगितले.

काँग्रेसचा धोरणाला पाठींबा

या प्रस्तावाला काँग्रेसनेही (Congress) पाठींबा दिल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा (Opposition Leader Ravi Raja) यांनी सांगितले. वास्तविक, हे धोरण सन २००८ मध्येच तयार होऊन मंजुरील येणे अपेक्षित होते. मात्र यापुढे चिटणीस पदी कोणाची नेमणूक करताना कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये. म्हणूनच आम्ही या धोरणाला पाठिंबा दिला.

यामागे कुणाला पाठीशी घालण्याचा आमचा हेतू नाही मात्र या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

न्यायालयात जाणार – भाजप

पालिका चिटणीस विभागात सेवा ज्येष्ठता पद्ध्ती लागू करण्याबाबत प्रशासनाने एक धोरण तयार केले असून त्याबाबतचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, धोरणाबाबतचा प्रस्ताव हा कोणाच्या तरी फायद्यासाठी तयार करण्यात आलेला असल्याचा आरोप करीत भाजपने या प्रस्तावाला बैठकीत विरोध केला.

पालिका चिटणीस पदी संगीता शर्मा यांनी नेमणूक करताना उप चिटणीस शुभांगी सावंत यांची सेवा जेष्ठताच नव्हे तर त्यांच्याकडील गुणवत्ताही डावलण्यात आली आहे, असा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे (BJP group leader Prabhakar Shinde) यांनी यावेळी केला.

वास्तविक पाहता, एका कोकण कन्येवर अन्याय करणारा हा प्रस्ताव आहे. या संदर्भात शुभांगी सावंत न्यायालयात गेलेल्या आहेतच. पण भाजप पक्षसुद्धा न्यायालयात दाद मागणार आहे, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here