@maharashtracity

वरळी गॅस सिलिंडर दुर्घटनेतील लहान मुलाच्या मृत्यूचे पडसाद

भाजपकडून चौकशीची मागणी

सत्ताधारी व पालिका प्रशासनला जबाबदार ठरवत भाजपने केला निषेध

आरोग्य समितीवरील भाजप सदस्यांचे राजीनामे

मुंबई: वरळी बीडीडी चाळीतील गॅस सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या 3 महिन्याच्या बालकाच्या मृत्यूला सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत आरोग्य समितीवरील भाजपच्या ११ सदस्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

वरळी, बीडीडी चाळीतील एका घरात मंगळवारी झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटातील गंभीर जखमींना उपचार देण्यात नायर रुग्णालयात अक्षम्य हलगर्जीपणा झाल्यानेच मंगेश पुरी (३ महिने) या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, असा आरोप भाजपतर्फे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

या घटनेची चौकशी महापालिकेबाहेरील (BMC) तज्ञ डॉक्टरांच्या त्रयस्थ समितीद्वारे (independent committee) करण्यात यावी. तसेच, रुग्णालयातील दोषी डॉक्टरांवर आग्रीपाडा पोलिस ठाण्यामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (culpable homicide) दाखल करण्याची मागणी भाजपतर्फे (BJP) लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मंगेश पुरी या लहान मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने त्याचे तीव्र पडसाद पालिका वर्तुळात उमटले आहेत. भाजपने आक्रमकपणा दाखवत सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांना टार्गेट करीत चांगलीच तोफ डागली आहे.

नायर रुग्णालय(Nair Hospital) प्रशासन आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वरळी मतदार संघामधील बीडीडी चाळीतील गॅस सिलिंडर स्फोटात भाजलेल्या चिमुकल्यावर तब्बल तासभर कोणताही उपचार न केल्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे.

पीडित कुटुंबीयांना २५ लाख रुपये भरपाई देण्याची मागणी

भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, आ. योगेश सागर, आ.अमित साटम, गटनेते प्रभाकर शिंदे, विनोद मिश्रा आणि नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने नायर रुग्णालयात धाव घेऊन अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांची भेट घेतली. तसेच, या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

यावेळी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी सीसीटीव्ही फुटेज पाहून रुग्णसेवेत अक्षम्य हलगर्जीपणा झाल्याचे व उपचारात खूपच विलंब झाल्याचे मान्य केले, असे भाजपकडून सांगण्यात आले.

पालिका पेंग्विनवर (Penguine) दररोज दीड लाख रुपये, वर्षभरात साडेचार कोटी रुपये खर्च करते. मात्र रुग्णालयातील सेवासुविधांकडे दुर्लक्ष करण्यात येते आहे, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, भाजपा शिष्टमंडळाने मृत मुलाच्या नातेवाईकांना २५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी केली.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतरही नायर रुग्णालयात सत्ताधारी पक्षातर्फे महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, स्थायी समिती अध्यक्ष, आरोग्य समिती अध्यक्ष यापैकी कोणीही फिरकलेसुद्धा नाहीत. साधी दखलही घेतली नाही. मुर्दाड प्रशासनाचे व सत्ताधार्‍यांचे हे वर्तन अत्यंत वेदनादायी, चिंताजनक आणि निंदनीय आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप गटनेते प्रभाकर शिंदे (Prabhakar Shinde) यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here