@maharashtracity

पश्चिम उपनगरात ७३० कोटींची कामे

पूर्व उपनगरात ५४७ कोटींची कामे

शहर भागात ४४२ कोटींची कामे

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक (BMC Polls) एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीपूर्वीच नगरसेवकांच्या (Corporators) वार्डात सिमेंट रस्त्यांची लहान, मोठी अशी १ हजार ७२० कोटी रुपयांची कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. या रस्ते कामांशी संबंधित तब्बल ३९ प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीला येणार आहेत.

यामध्ये, काही कंत्राटदारांवर (contractor) खूप अधिक मेहेरबानी झाली आहे. काही कंत्राटदारांना २ तर काहींना ६ कामांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच कंत्राटदारांची चांदीच चांदी होणार आहे.

थोडक्यात, ‘चारो उंगलिया घी मे और सर कढाई मे’, अशी अवस्था होणार आहे. साहजिकच या कामांशी संबंधित नगरसेवकांचेही ‘चांगभलं’ होणार आहे. निवडणुकीपूर्वीच रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने आपल्या कार्य अहवालात रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे मार्गी लावल्याचे ‘क्रेडिट’ त्यांना घेता येणार आहे.

बाकी ज्या कंत्राटदारांशी संबंधित अधिकाऱ्यांचे ‘हितसंबंध’ चांगले आहेत, त्यांना केलेल्या कामांमुळे ‘चांगले दिवस’ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

या १ हजार ७२० कोटी रुपयांच्या सिमेंट रस्ते (cement road) कामांच्या अंतर्गत पश्चिम उपनगरे भागात तब्बल ७३० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे, त्या पाठोपाठ पूर्व उपनगरे भागात ५४७ कोटी रस्त्यांची कामे तर सर्वात कमी म्हणजे शहर भागात ४४२ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे, अशी करण्यात येणार आहेत.

मे. नवदीप कंत्राटदाराला २८९ कोटींची ६ कंत्राटकामे

या कंत्राटकामात सर्वात जास्त २८९ कोटी रुपयांची ६ कंत्राटकामे मे. नवदीप कन्स्ट्रक्शनला मिळाली आहेत. तसेच, मे. ग्यान कन्स्ट्रक्शनला १५१ कोटी रुपयांची ३ कंत्राटकामे तर मे. प्रगती एंटरप्राइज यांना १७० कोटी रुपयांची ३ कंत्राटकामे मिळाली आहेत.

मे. रिद्धी एंटरप्राइज या कंत्राटदाराला ७७ कोटी रुपयांची २ कंत्राटकामे आणि मे. जैन कन्स्ट्रक्शनला २९ कोटी रुपयांची २ कंत्राटकामे मिळणार असल्याने त्यांना कोट्यवधी रुपयांची लॉटरी लागणार आहे.

मात्र, सर्व कंत्राटदार हे किमान १३ टक्के ते २४ टक्के कमी दरात कामे करणार असल्याने रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकते. तसेच, हे कंत्राटदार ही रस्त्यांची कामे किमान १० महिने ते २४ महिने या कालावधीत करणार आहेत.

या सिमेंट रस्त्यांची कामे केल्यावर त्याचा हमी कालावधी हा ५ वर्षांचा असणार आहे. या कालावधीत रस्ते खराब झाल्यास त्या कंत्राटदाराने त्याची दुरुस्ती करणे बंधनकारक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here