@maharashtracity

मुंबईला समुद्रमार्गे अतिरेक्यांचा धोका असल्याने निर्णय

मुंबई: मुंबईत समुद्रमार्गे अतिरेक्यांची घुसखोरी (infiltration of militant by sea) व आतंकवादी हल्ला (terror attack) रोखण्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) सुचनेनुसार शहर व उपनगरांतील भूमिगत पातमुखांच्या ठिकाणी सुरक्षात्मक मजबूत लोखंडी जाळ्या (protective net) बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिका २३ लाख ९३ हजार रुपये खर्चणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मुंबईच्या म्हणजेच देशाच्या सुरक्षिततेचा (national security) एक भाग म्हणून हे काम महत्वाचे असल्याने हा प्रस्ताव बिनविरोध मंजूर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबईत यापूर्वी २६/११ चा आतंकवादी हल्ला व त्यासाठी पाकिस्तानी अतिरेकी (Pakistani terrorist) अजमल कसाब (Ajmal Kasab) व त्याच्या सहकार्यांनी समुद्रमार्गे केलेली घुसखोरी आणि अतिरेकी हल्ल्यात झालेली मोठी वित्तीय, जीवित हानी कोणताही मुंबईकर, सच्चा देशभक्त नागरिक कदापि विसरणार नाही.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत राज्याच्या आणि मुंबईच्या सुरक्षिततेबाबत ४ नोव्हेंबर २०२० रोजी एक महत्वपूर्ण बैठक पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांनी अतिरेक्यांच्या घुसखोरी व हल्ल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन अतिरेक्यांना रोखण्यासाठी मुंबईतील भूमिगत पातमुखांच्या ( मुंबईतील सांडपाणी भूमिगत वाहिन्यांच्या मार्फत समुद्रात सोडण्यात येते) (outlet) ठिकाणी संरक्षकात्मक लोखंडी जाळ्या बसविण्याची सूचना मुंबई महापालिकेला केली होती.

त्यानुसार मुंबई पोलिसांनी सांगितलेल्या महत्वाच्या पातमुखांच्या ठिकाणी पालिकेने संरक्षणात्मक लोखंडी जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला होता. त्यास पालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी २५ नोव्हेंबर २०२० रोजी मंजुरी दिली होती.

पालिकेने या कामांसाठी निविदा (tender) न मागवता लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम करून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यासाठी आवश्यक स्थायी समितीची मंजुरी घेण्यात आली नव्हती. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने, या कामांचा प्रस्ताव नियम ७२ (३) अनव्ये स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here