@maharashtracity

मुंबई: मुंबईतील भटक्या कुत्र्यांवर (street dog) मुंबई महापालिका (BMC) दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र भटक्या कुत्र्यांचा उपद्रव व त्यांची वाढती संख्या काही नियंत्रणात येताना दिसत नाही. आता या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिका १ कोटी २ लाख रुपये खर्चून ४ डॉग व्हॅनची खरेदी करणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकित मंजुरीसाठी येणार आहे. या प्रस्तावावरून विरोधी पक्ष व पहारेकरी भाजप (BJP) यांच्याकडून भटक्या कुत्र्यांची समस्या मार्गी लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व लाखो रुपयांच्या खर्चाचा हिशोब मागितला जाण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत पाळीव कुत्र्यांची संख्या कमी व भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. या भटक्या कुत्र्यांकडून नागरिकांवर अगदी लहान मुलांवरही हल्ले होत असतात. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांकडून लहान मुलांना व मोठया व्यक्तींना चावा घेण्याच्या घटना नेहमीच घडत असतात.

कुत्र्यांनी चावा घेतल्याने पिडीत व्यक्तीला, लहान मुलांना ‘रेबीज’ (rabies) आजार होण्याची व त्यावर वेळीच योग्य उपचार न झाल्यास तो आजार जीवावर बेतण्याची दाट शक्यता असते.

मुंबई महापालिका भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही खासगी संस्थांच्या मार्फत कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण (sterilization) करते. मात्र यासंदर्भातील उपाययोजना अगदी कासवगतीने सुरू आहे.

त्यामुळे आजही अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्या अनेक पिल्लांना जन्माला घालतात. त्यामुळे कुत्र्यांच्या संख्येत वाढ होताना व त्यांचा नागरिकांना उपद्रव होताना दिसून येते.

पालिका खासगी संस्थांना उपद्रवी कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनेवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करते. मात्र या एकूण उपाययोजनांची अपेक्षित झाडाझडती व हिसाबकिताब योग्य पद्धतीने होत नसल्याने मुंबईत आजही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि समस्या कायमस्वरूपी निकालात निघतांना दिसत नाही.

मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग व देवनार कत्तलखान्याचे (Deonar slaughter) महाव्यवस्थापक यांच्या अखत्यारित खासगी संस्था व श्वान नियंत्रण कक्ष भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बिजीकरण करणे आदी कामे करण्यात येतात.

आता भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणारी ‘डॉग व्हॅन’ (Dog Van) मुदत संपल्याने कालबाह्य ठरत आहेत. त्यामुळे पालिकेने या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी १ कोटी २ लाख रुपये खर्चून मे. अँटोनी या वाहन पुरवठादाराकडून नव्याने ४ डॉग व्हॅन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि त्याबाबतचे कार्यादेश मिळाल्यानंतर या डॉग व्हॅनची खरेदी करून करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here