@maharashtracity
मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) जानेवारी २०२१ पासून लसीकरण मोहीम सुरू केली आहे. गेल्या दीड वर्षांत अनेक मुंबईकरांमध्ये ‘अँटीबॉडिज’ (antibodies) तयार झाल्याचे पालिकेने आतापर्यंतच्या केलेल्या पाच सेरो सर्व्हेक्षणामधून (Sero survey) समोर आले आहे.
येत्या डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात सहावा सेरो सर्व्हेक्षण होण्याची आणि कदाचित त्यानंतर बूस्टर किंवा तिसरा डोस देण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत गेल्या मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. कोरोनाला रोखण्यासाठी सध्या तरी जगातील बाजारात ठोस औषध उपलब्ध नाही. कोरोना प्रतिबंधात्मक लस व नियम हेच उपाय आहेत. याद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला चांगले यश आल्यानेच मुंबईत कोरोनाची पहिली व दुसरी लाट परतवून लावण्यात आणि तिसरी लाट रोखण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला चांगले यश आले.
त्यामुळे सध्या पालिका यंत्रणा अधिकाधिक लसीकरणावर भर देत आहे.
दरम्यान, पालिकेने आतापर्यंत केलेल्या पाच सेरो सर्व्हेक्षणामधून अनेक नागरिकांमध्ये ‘अँटीबॉडिज’ तयार झाल्याचे समोर आले आहे.
लसीकरणामुळे नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याचा अभ्यास करण्यासाठी डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात सहावा सेरो सर्व्हेक्षण केले जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या सेरो सर्व्हेक्षणाच्या अहवालानंतर बूस्टर किंवा तिसरा डोस देण्याबाबत विचार केला जाईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.
आतापर्यंत करण्यात आलेल्या पाचही सेरो सर्व्हेक्षणात नागरिकांमध्ये अँटीबॉडीज निर्माण झाल्याचे समोर आले आहे. त्यानंतर आता लसीकरण केल्यावर मुंबईकरांमध्ये अँटिबॉडीज निर्माण झाली आहे का, हे तपासण्यासाठी येत्या डिसेंबर जानेवारी दरम्यान सेरो सर्व्हे केला जाणार आहे.
वास्तविक, ९९ टक्के मुंबईकरांनी लसीचा पहिला डोस तर ७० टक्के मुंबईकरांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. गेल्या वर्षभरात पहिला डोस, दुसरा डोस व डोस न घेतलेल्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाली का याचा अभ्यास करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यांत ६ वे सेरो सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डातून डोस घेतलेल्या व डोस न घेतलेल्यांचे रक्ताचे नमुने संकलीत करण्यात येणार आहेत. या सर्वेक्षणातून लस किती उपयुक्त ठरली हे स्पष्ट होणार आहे.
या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मुंबईकरांमध्ये किती टक्के अँटीबाॅडीज निर्माण झाल्या आहेत, याचा अभ्यास करण्यात येणार आहे.
या अभ्यासानंतर बुस्टर डोस (booster dose) देणे किंवा तिसरा डोस (third dose of vaccination) देणे याबाबत विचार करण्यात येईल, असे काकाणी यांनी सांगितले.