@maharashtracity

मुंबई: मुंबईतील १२ हजार ७२१ कोटी रुपयांच्या कोस्टल रोड प्रकल्पाअंतर्गत (coastal road project) कंत्राटकामाचा कालावधी ६८ महिन्यांवरून ९२ महिने इतका वाढल्याने या कामासाठी नियुक्त सल्लागाराच्या (consultant) शुल्कात ११ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सल्लागाराला प्रथम ६८ महिन्यांच्या कामासाठी ३४.९२ कोटी रुपये शुल्क ठरविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कामात बदल झाल्याने सल्लागाराला त्यापोटी ५.९१ कोटी रुपये शुल्कवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा आता कामाच्या कालावधीत २४ महिन्यांची वाढ झाल्याने त्यापोटी सल्लागाराला ५.१२ कोटी रुपयांची शुल्कवाढ देण्यात येणार आहे.

त्यामुळे सल्लागाराची शुल्काची रक्कम ही ३४.९२ कोटी रुपयांवरून ४५.९५ कोटी रुपयांवर गेली आहे. त्यामुळे सल्लागाराच्या शुल्कात एकूण ११ कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मध्यंतरी या कोस्टल रोड प्रकल्पाच्या सल्लागार, ठेकेदाराला नियमबाह्य पद्धतीने कोट्यवधी रुपयांची रक्कम दिल्याचा ठपका ठेवत कॅगने (CAG) ताशेरे ओढले होते. त्यामुळे भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी, सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) व पालिका प्रशासन यांच्यावर जोरदार टीका करीत गंभीर आरोप केले होते. त्यामुळे पालिकेला त्याबाबत खुलासा करावा लागला होता.

कोस्टल रोडच्या कामांत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार अथवा गैरव्यवहार झालेला नाही. यासंदर्भातील सर्व आरोप निराधार व बिनबुडाचे आहेत, असे सांगत पालिकेने व सत्ताधारी शिवनसेने आरोप फेटाळून लावले होते. मात्र कोस्टल रोडच्या कामावरून महापालिकेत जोरदार पडसाद उमटले होते. भाजप नगरसेवक आक्रमक झाले होते तर शिवसेना नगरसेवकही आक्रमक झाले होते.

आता पुन्हा एकदा कोस्टल रोडच्या कामांत फेरफार व वाढीव शुल्क देण्याचा प्रस्ताव मंजुरीला आल्याने त्यावरून भाजप पुन्हा एकदा आक्रमक होण्याची दाट शक्यता असून शिवसेनेकडूनही त्यास जोरदार प्रत्युत्तर दिले जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

कोस्टल रोड प्रकल्पासाठी प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत दक्षिण बाजुसाठी एईकॉम एशिया कंपनी लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचा कालावधी ६८ महिन्यांकरिता (पावसाळ्यासह) होता.

सल्लागार सेवेसाठी या कंपनीला ३४ कोटी ९२ हजार रुपये शुल्क दिले जाणार होते. या प्रकल्पाच्या कामासाठी तीन टप्प्यात ठेकेदार नियुक्त केल्यानंतर आतापर्यंत कोस्टल रोडचे ४० टक्क्यांहून अधिक काम झाले आहे. हे काम २०२३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र या कामासाठी नेमलेल्या साधारण सल्लागाराने वाढीव शुल्काची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here