@maharashtracity

मुंबई मनपातील विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप

मुंबई: मुंबई महापालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राट (Pay and Parking contract) कामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा होत असून पालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असल्याचा खळबळजनक आरोप पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा (Ravi Raja) यांनी हरकतीच्या मुद्द्याद्वारे पालिकेच्या ऑनलाईन सभेत केला.

मुंबईत अंदाजे २५० पे अँड पार्किंग सेंट्रल एजन्सीकडे आहेत. तर वार्डनिहाय ५०० पे अँड पार्किंग आहेत. या सर्व पे अँड पार्किंगच्या कंत्राटकामातून पालिकेला दरवर्षी किमान १०० कोटींचे उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र त्यावर संबंधित कंत्राटदार व पालिका अधिकारी हेच हात मारून आपले खिसे भरत आहेत. त्यामुळे पालिकेला कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. या कंत्राटकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा (corruption in pay & park contract) होत आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

मुंबईतील विशेषतः शहर भागातील पे अँड पार्किंगची कंत्राटकामे अख्तर नावाच्या एकाच कंत्राटदाराकडे मोठ्या प्रमाणात असतात. अनेक वर्षांपासून त्याची मक्तेदारी व मनमानी सुरू आहे. त्याची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठीच सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मागणीवरून महिला बचतगटांना काही ठिकाणी पे अँड पार्किंगची कामे देण्यात आली. (उदा. ‘ए’, ‘के/पश्चिम’, ‘पी/ उत्तर ‘, ‘ पी/दक्षिण’ वार्डात )

मात्र, अख्तरने तेथेही पालिका अधिकारी यांच्याशी संगनमत करून तेथील कंत्राटकामे स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. मात्र पालिका प्रशासन त्याबाबत काहीच कारवाई करीत नाही.

वास्तविक, मुंबई महापालिकेच्या (BMC) पे अँड पार्किंग कंत्राट कामातून महिला बचतगटाला (Women Self Help Groups – SHG) आर्थिक उत्पन्न मिळावे व त्यांनी स्वबळावर पुढील वाटचाल करावी या उदात्त हेतूने पालिकेच्या काही पे अँड पार्किंग कंत्राटकामे काही महिला बचतगटांना देण्यात आली होती.

मात्र अख्तरने या महिला बचतगटांकडील काही कंत्राटकामे सब कंत्राटदार बनून स्वतःच्या ताब्यात घेतली आहेत. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून तोच ही कंत्राटकामे गैरमार्गाने मिळवून कोट्यवधी रुपयांचा मलिदा खात आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला.

तसेच, पालिकेची काही पे अँड पार्किंगची ठिकाणे पालिकेने कारवाई करून काही कारणास्तव ताब्यात घेतली असून त्या ठिकाणी दुसरा कंत्राटदार नेमले जात नाहीत. परिणामी जुनाच कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांशी संगनमत करून उत्पन्नावर ताव मारत आहेत, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे.

तर दुसरीकडे वर्षांनुवर्षे एकाच कंत्राटदार पालिकेच्या पे अँड पार्कवर कोट्यवधी रुपयांची लूट करीत आहे, असा आरोपही रवी राजा यांनी यावेळी केला.

यावेळी, महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी, प्रशासनाने पालिका पे अँड पार्किंग प्रकरणी माहिती घेऊन अहवाल सादर करावा, असे आदेश देत रवी राजा यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.

“आपल्याकडे पालिकेच्या पे अँड पार्किंग कंत्राटकामांबाबत काही तक्रारी आल्या आहेत. आपण स्वतः काही ठिकाणी अचानक धाड घालून पे अँड पार्किंग कामांची झाडाझडती घेणार आहे.”

  • किशोरी पेडणेकर, महापौर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here