@maharashtracity

सायन रुग्णालय अखत्यारीत आरोग्य केंद्रासाठी ८ कोटींचा खर्च ; ६ कोटी अदा

मुंबई: आशिया (Aisa) खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून नावलौकिक असलेल्या मुंबई महापालिकेवर (BMC) संबंधित खात्यात पैशांची चणचण असल्याने एका कंत्राटदराचे २.२४ कोटीं रुपये थकीत ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.

एवढेच नव्हे तर त्या कंत्राटदाराला (Contractor) त्याची थकबाकीची रक्कम देण्यासाठी पालिकेने नायर रुग्णालयाच्या (Nair Hospital) दुरुस्ती कामासाठी तरतूद निधीवर डल्ला मारून त्यापैकी १.५० कोटींचा निधी कंत्राटदाराला देण्यासाठी वळविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे या प्रस्तावावर पालिकेतील पहारेकरी भाजपच्या (BJP) नगरसेवकांकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

Also Read: भटक्या कुत्र्यांना पकडण्याकरिता ‘डॉग व्हॅन’ खरेदीसाठी १ कोटी रुपये खर्चणार

मुंबई महापालिका आरोग्य खात्याने सायन रुग्णालयाच्या (Sion Hospital) अखत्यारीत असलेल्या धारावी ९० फिट रोड येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीची ८ कोटी २४ लाख रुपये खर्चून मोठ्या दुरुस्तीची कामे २०१८ ते २०२१ या कालावधीत पूर्ण करून घेतली.

त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला त्याची बिलाची रक्कम देणे भाग होते. त्यानुसार पालिकेने कंत्राटदाराला ठरलेल्या ८ कोटी २४ लाख रुपये तात्काळ देणे अपेक्षित होते.

मात्र पालिकेने सायन रूग्णालयाशी निगडित दुरुस्ती कामांसाठी अर्थसंकल्पात फक्त ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे पालिकेला या कंत्राटदाराची ८ कोटी २४ लाख रुपयांचे बिल देणे शक्य झाले नाही.

पालिकेने ६ कोटी रुपयांची व्यवस्था करून व त्या कंत्राटदाराला रक्कम दिली. तरीही उर्वरित २ कोटी २४ लाख रुपयांची रक्कम देणे बाकी राहिले. या रकमेची उभारणी करण्यासाठी एक शक्कल लढवली.

पालिकेने नायर रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या (Residential doctors) निवासस्थानाची जुनी इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत उभारण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात (Budget) १० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. या कामाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू असल्याने व कामाला अद्याप सुरुवात न झाल्याने त्या १० कोटींच्या निधीवर प्रशासनाची नजर गेली.

त्यानुसार, पालिकेने या १० कोटीमधून १ कोटी ५० हजार रुपयांचा निधी काढण्याचा निर्णय घेतला. हा दीड लाखांचा निधी काढून तो सायन रुग्णालयाशी निगडित आरोग्य केंद्राची दुरुस्ती करणाऱ्या कंत्राटदाराची थकीत रक्कम देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यासाठी स्थायी समितीची मंजुरी घेण्यासाठी तसा प्रस्ताव तयार करून मंजुरीला आणण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here