@maharashtracity
मुंबई: धारावी, (Dharavi) शाहू नगर येथील एका चाळीच्या ठिकाणी २९ ऑगस्ट रोजी झालेल्या गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात (Gas Cylinder blast) जखमी झालेल्या १७ व्यक्तींपैकी आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जखमी अवस्थेतील उर्वरित १२ जणांपैकी ४ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर ८ जण अद्यापही रूग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असून ५ जणांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने कळवले आहे.
धारावी, शाहूनगर येथे २९ ऑगस्ट रोजी एका चाळीच्या ठिकाणी एका घरातील व्यक्तीने घरगुती गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होत असल्याने घरासमोरील गल्लीतील मोकळ्या जागेत सदर गॅस सिलिंडर आणून ठेवला. मात्र या सिलिंडरमधील गळती होत असलेल्या गॅसचा आगीशी संपर्क होऊन भीषण स्फोट झाला होता. त्यामध्ये १७ जण जखमी झाले होते. त्यापैकी ५ जण गंभीर जखमी झाले होते. या सर्वांवर नजीकच्या सायन रुग्णालयात उपचार सुरू होते.
मात्र उपचार सुरू असतानाच, गंभीर जखमी सोनू जयस्वाल (८) या लहान मुलाचा ३१ ऑगस्ट रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर १ सप्टेंबर रोजी सितारादेवी जैस्वाल (४० महिला) यांचा, तर अंजु गौतम (२८ महिला) यांचा ३ सप्टेंबर रोजी आणि शौकत अली (३५) व फिरोज अहमद (३६) यांचा ५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.