@maharashtracity

मलेरिया, डेंग्यू निर्मूलनासाठी २२७ वार्डातील नगरसेवकांची मागणी
महालक्ष्मी धोबीघाट येथे ड्रोनद्वारे महापौरांच्या उपस्थितीत फवारणी
एका ड्रोनची किंमत ७.५० लाख रुपये
२२७ वॉर्डात प्रत्येकी १ प्रमाणे १७ कोटींच्या ड्रोनची आवश्यकता

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात, इमारत बांधकामाच्या ठिकाणी मलेरिया (Malaria), डेंग्यूच्या (Dengue) डासांची होणारी पैदास रोखण्यासाठी व मलेरिया, डेंग्यू निर्मूलनासाठी पालिकेने जून महिन्यापासून साडेसात लाख रुपयांच्या ( सीएसआर फंड) विशेष ‘ड्रोन’द्वारे कीटकनाशक फवारणी (spraying pesticides using drone) करण्यात येत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांवर काहिसे नियंत्रण येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत आज महालक्ष्मी येथील धोबिघाट परिसरात ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी करण्यात आली. याप्रसंगी जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच किटकनाशक विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे अशा विशेष ‘ड्रोन’साठी आता सर्वपक्षीय नगरसेवकांकडून महापौरांकडे मागणी केली जात आहे. त्यामुळे आता २२७ वार्डात प्रत्येकी एक याप्रमाणे २२७ ड्रोनसाठी प्रत्येकी ७ लाख ५० हजार रुपये दराने किमान १७ कोटी २ लाख ५० हजार रुपये खर्च येणार आहे.

पालिका जी/ दक्षिण प्रभागात सध्या जो एक ड्रोन कीटकनाशक फवारणीसाठी वापरत आहे, तो सीएसआर फंडातून (CSR Fund) खरेदी करण्यात आलेला आहे. त्यामुळे पालिकेला या ड्रोनसाठी काही खर्च करण्याची गरज पडलेली नाही. मात्र आता २२७ वार्डात जर प्रत्येकी एका ड्रोनचा वापर करावयाचा असेल तर त्यासाठी पालिका तिजोरीमधून अथवा सीएसआर फंडाची तेवढी जमवाजमव करून त्यातून १७ कोटी २ लाख ५० हजार रुपये खर्चावे लागतील.

त्यामुळे मात्र मुंबईतील मलेरिया, डेंग्यू यांच्या डासांची उत्पत्ती स्थाने समूळ नष्ट करणे शक्य होणार असून मलेरिया, डेंग्यूच्या आजारावरही पूर्णपणे नियंत्रण येणार आहे.

ड्रोनद्वारे किटकनाशक फवारणी करण्याबाबतची संकल्पना राज्याचे पर्यावरण व पालक मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची असून त्याचा चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबईकरांचे आरोग्य चांगले रहावे हा आमचा प्रयत्न असून प्रत्येक वार्डला एक ड्रोन देण्याची मागणी नगरसेवकांनी केली असल्याचे महापौरांनी सांगितले. कमी पैशात जास्त परिणामकारकता यातून साध्य होत असल्यामुळे मलेरिया व डेंग्यूची रुग्णसंख्या निश्चितच कमी होण्यास यामुळे हातभार लागणार आहे.

त्यासोबतच नागरिकांनी आपल्या घरांमध्ये सुद्धा काळजी घेणे गरजेचे असून घरातील शोभिवंत कुंड्यांची तावदाने, वातानुकुलित यंत्रणांमधील टाक्यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे महापौर यांनी सांगितले.

जी /दक्षिण विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मोडकळीस आलेल्या मिल्स, लोअर परेल रेल्वे वर्कशॉपच्या ठिकाणी असणारे रूफ गटर, झोपडपट्टीच्या वरील भागात ठेवण्यात आलेल्या ताडपत्री अश्या ठिकाणी पावसाळांमध्ये पाणी साचून मलेरिया वाहक डांसाची उत्पत्ति होत असते.

या ठिकाणी पाहणी करण्याकरीता व अळीनाशक फवारणी करण्याकरीता किटकनियंत्रण खात्याच्या कर्मचाऱ्यांना पोहोचता येत नसल्यामूळे या ठिकाणी डास उत्पत्ति होऊन मलेरिया रुग्णांमध्ये वाढ होते. त्यामुळे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संलल्पनेनुसार, ड्रोन खरेदी करून ड्रोनच्या सह्याने जून महिन्यापासून कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे.

ड्रोनबाबत माहिती

या ड्रोनची किंमत ७.५० लाख रुपये एवढी आहे. या ड्रोनची टँक क्षमता १० लिटर व बॅटरीची क्षमता अर्धा तास आहे. हा ड्रोन उडविण्यासाठी थींक केअर (Think Care company) कंपनीची मदत घेऊन प्रशिक्षित पायलटद्वारे ड्रोन उडवला जात आहे.

तसेच याव्यतिरिक्त कीटकनियंत्रण खात्यांच्या कर्मच्या-यांमार्फत विभागामध्ये एकूण ६८९ एवढे मलेरियावाहक डांस उत्पत्ति स्थाने शोधून नष्ट करण्यात आली. याचा परिणाम पाहता जी/दक्षिण विभागात गत वर्षी पावसाळा कालावधीमध्ये जून ते ऑगस्ट २०२० मध्ये ९०० मलेरिया रुग्ण सापडले होते. यावर्षी याच जून ते ऑगस्ट २०२१ कालावधीमध्ये मलेरिया रुग्णांमध्ये घट होऊन एकूण ४७४ मलेरिया रुग्ण सापडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here