@maharashtracity

मुंबई महापालिकेचा दावा

कंत्राटदाराने फक्त ८,५०१ खड्डे बुजवले

पालिका कर्मचाऱ्यांनी २२,८९७ खड्डे बुजवले

खड्ड्यांची समस्या कायमस्वरूपी मार्गी काढण्यासाठी यापुढे ६ मिटर रुंदीचे सीसी रोड

मुंबई: मुंबईत १० सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीदिनी (Ganesh Chaturthi) विघ्नहर्ता गणेशाचे आगमन होत आहे. गणेश आगमनाप्रसंगी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे (potholes) एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटून त्याचे खापर पालिकेवर फोडण्यात येईल. याची पूर्ण जाणीव असलेल्या मुंबई महापालिकेने ९ एप्रिलपासून ते ८ सप्टेंबर या कालावधीत ३१ हजार ३९८ लहान – मोठे खड्डे बुजविले आहेत. हे खड्डे बुजविल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

यामध्ये, कंत्राटदाराने फक्त ८ हजार ५०१ खड्डे तर पालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल २२ हजार ८९७ खड्डे बुजविल्याचा दावा केला आहे.

विशेष म्हणजे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत माहिती देताना पालिका प्रशासनाने, रस्त्यांवरील खड्ड्यांना निकृष्ट दर्जाची साधनसामग्री, संबधित कंत्राटदार जबाबदार असल्याचे पालिकेने कुठेही म्हटलेले नाही अथवा तसे काही मान्य केलेले नाही. मात्र, पावसाळी पाण्यामुळेच डांबरी रस्त्यांवर खड्डे पडण्याची समस्या निर्माण होत असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

तसेच, ज्या रस्त्यावर खड्डे पडले होते व ते रस्ते हमी कालावधीतील असतील तर संबंधित कंत्राटदारांमार्फतच सदर खड्डे बुजविण्यात आले असल्याचा दावाही पालिकेने केला आहे.

मुंबईतील रस्ते व खड्ड्यांच्या समस्येवरून विरोधक व भाजप (BJP) यांनी पालिकेला आणि सत्ताधारी शिवसेनेवर (Shiv Sena) आरोपांच्या फैरी झाडत चांगलेच फैलावर घेऊन जाब विचारला होता. रस्ते बांधकामांवर हजारो कोटी रुपयांचा खर्च करूनही रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन अपघात होतात आणि त्यामध्ये नागरिकांचा नाहक बळी जात असतो, असे विरोधकांनी म्हटले होते.

त्यावर आपले स्पष्टिकरण देताना, मुंबई महापालिका (BMC) प्रशासनाने ९ एप्रिल ते ८ सप्टेंबर २०२१ या कालावधीमध्ये रस्त्यांवरील ३१ हजार ३९८ खड्डे बुजवले आहेत. त्याचे क्षेत्रफळ सुमारे १ लाख ५६ हजार ९१० चौरस मीटर इतके होते. विशेषतः डांबरी रस्त्यांवर पावसाळी पाण्यामुळे खड्डे तयार होण्याची समस्या निर्माण होते, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या यापुढे कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी मोठ्या रस्त्यांसह ६ मीटर रुंदीच्या लहान रस्त्यांचेही सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचे धोरण महापालिका प्रशासनाने अवलंबले असून त्याची कार्यवाही सुरु झाली असल्याचे महापौरांनी सांगितले.

रस्त्यांवर पडलेले खड्डे त्वरीत बुजविण्यासाठी पालिकेच्या वरळी स्थित धूम्रजतू संयंत्र (अस्फाल्ट प्लांट) येथे निर्मित कोल्ड मिक्स पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांना पुरवण्यात आला आहे.

रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व खड्डे बुजविण्यासाठी परिमंडळांनुसार निविदा काढून कंत्राटदार नियुक्त केलेले आहेत. हे कंत्राट द्विवार्षिक स्वरुपाचे आहेत. प्रत्येक विभाग कार्यालयाला दरवर्षी २ कोटी रुपयांचा निधी देखील उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

यामध्ये प्रामुख्याने दीड कोटी रुपये हे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी तर उर्वरित ५० लाख रुपये हे खड्डे बुजविण्यासाठी दिले आहेत, असा दावाही पालिकेने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here