@maharashtracity

सार्वजनिक गणेश मूर्तीसाठी ४ फुटांची मर्यादा
विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी
मोठ्या गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी ऑनलाइन सुविधा देण्याची सूचना
विसर्जन स्थळी मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी
चौपाटयांवर १० गणेश भक्तांनाच विसर्जनासाठी परवानगी
चौपाटीवर गणेश आरती करण्यास मनाई
पालिका कर्मचारीच विसर्जन करणार

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण पुढे करीत राज्य शासन व मुंबई महापालिकेने (BMC) गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणेशोत्सवावर (Ganesh Festival) काही निर्बंध घातले आहेत.

गणेशमूर्तींची उंची केवळ ४ फुटांपर्यंत असावी, अशी मर्यादा गणेशमंडळांना घालण्यात आली आहे. तर गतवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास सार्वजनिक मंडळांनी आक्षेप घेतल्याने यंदा केवळ १० कार्यकर्त्यांना गणेश मंडप ते विसर्जन स्थळापर्यंत म्हणजे समुद्र चौपाटीपर्यंत गणेश मूर्ती नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र तेथे गणेश मूर्तींचे विसर्जन हे पालिका कर्मचारी हेच करणार आहेत.

त्यामुळे गणेश मंडळांमध्ये मात्र नाराजीचा सूर उमटला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी परळ येथे पालिका प्रशासन व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांच्यात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सवाबाबत शासन व पालिका यांनी तयार केलेल्या नियमांची माहिती गणेशोत्सव मंडळांना देण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे मुंबईची शान असते. मुंबईसारखा गणेशोत्सव संपूर्ण भारतात कुठेही साजरा होत नाही. या गणेशोत्सवानिमित्ताने सर्वधर्मीय, सर्वजातीय बांधव हे एकत्रित येऊन मुंबईत अगदी गल्लीबोळातही गुण्यागोविंदाने गणेशोत्सव साजरा करतात. मात्र गेल्या मार्च २०२० पासून मुंबईत कोरोनाने ठाण मांडले आहे.

कोरोनाची पहिली लाट मुंबईने कशीतरी परतवली. तर दुसऱ्या लाटेवर आता कुठे तरी नियंत्रण आले आहे. तोपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे दहीहंडी, गणेशोत्सव यासारखे मोठे सण, उत्सव त्यामुळे निर्माण होणारा जल्लोष तर दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव व तिसऱ्या लाटेची भिती आणि राजकीय विरोध, राजकारण अशा पेचात राज्य शासन व मुंबई महापालिका सापडली असून त्यांची मोठी गोची झाली आहे.

यंदाचा गणेशोत्सवही गतवर्षीप्रमाणेच साधेपणानेच साजरा करण्यात यावा, यावर राज्य शासन व महापालिका यांनी जोर दिला आहे. या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गर्दी वाढली व कोरोनाचा प्रादुर्भाव वाढून तिसरी लाट धडकली तर शासन व पालिका प्रशासन यांच्यासमोर कोरोनाचा रोखण्याबाबत मोठे संकट उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे.

यासंदर्भातील माहिती पालिकेचे उपायुक्त शरद काळे यांनी दिली.

मुंबईत गणेश मंडपात भक्तांची गर्दी वाढून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची व त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता पाहता पालिकेने प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तींचे दर्शन भक्तांना घेणे सुलभ होण्यासाठी गणेश मूर्तीचे ‘ऑनलाइन दर्शन’ घेण्याची सुविधा मंडळांनी करावी, अशी सूचना केली आहे.

तसेच, मंडपात गर्दी होण्याची शक्यता असल्याने ऑफलाईन दर्शनासाठी परवानगी देण्याबाबत राज्य सरकारच्या आदेशाने योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे उपायुक्त शरद काळे यांनी सांगितले.

यावेळी, गणेश मूर्तींची उंची ४ फुटांपेक्षा जास्त असावी, यासाठी परवानगी देण्यात यावी. गणेश मंडळात लसीचे २ डोस घेतलेल्या कार्यकर्त्याना मूर्ती विसर्जनाची परवानगी देण्यात यावी. तसेच, गणेश भक्तांना ऑनलाईन व ऑफलाईन दर्शन घेता यावे यासाठी परवानगी देण्याची यावी, आदी मागण्या गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आल्या आहेत, अशी माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे (शहर) अध्यक्ष नरेश दहीबावकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here