@maharashtracity

मुंबई: मुंबईमध्ये वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment minister Aaditya Thackeray) यांच्या संकल्पनेमधून दादर (प.) येथील ‘कोहिनूर’मधील पालिकेच्या वाहनतळाच्या ठिकाणी मुंबईतील पाहिले इलेक्ट्रिक वाहन ‘चार्जिंग’ सुविधा केंद्र (e-vehicle charging station) सुरू करण्यात आले आहे.

आता इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी बॅटरी चार्जर युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने टेंडरप्रक्रिया करून याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या (BMC) वाहन ताफ्यातील डिझेल, पेट्रोलची वाहने हळूहळू बंद करून त्याऐवजी पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहनांचा ताफा वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या शहर, उपनगरे येथील यानगृहाच्या जागेत इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी बॅटरी चार्जर युनिटची स्थापना करण्यात येणार आहे.

त्यासाठी मे. मॅक एनवायरोमेंट एन्ड सोल्युशन्स (इंडिया) प्रा. लि. या कंत्राटदाराला आवश्यक पायाभूत सुविधांसह बॅटरी चार्जर युनिटची स्थापना करणे, ३ वर्ष देखभाल व पुरवठा करण्याचे कंत्राटकाम देण्यात येणार आहे. पालिका या कामासाठी कंत्राटदाराला ७४ लाख रुपये मोजणार आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख अभियंता (घन कचरा व्यवस्थापन) विभागाच्या अंतर्गत विविध यानगृहात विविध प्रकारच्या ८५० वाहनांचा ताफा असून ह्या वाहनांचा २४ तास वापर करण्यात येतो, असा पालिकेचा दावा आहे.

पालिकेच्या परिवहन विभागामार्फत पालिका अधिकारी, पदाधिकारी, व्हीआयपी आदींना पर्सनल कॅरीअर वाहने उपलब्ध करून देणे ही परिवहन विभागाची जबाबदारी आहे. सध्या पालिकेच्या वाहन ताफ्यात १७१ नग पर्सनल कॅरीअर वाहनांचा ताफा आहे.

सध्या देशात वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. यावर उपाययोजना म्हणून आता प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने पाऊल उचलले आहे.

शहर विभागातील रुग्णवाहिनी यानगृह, पूर्व उपनगरातील पंतनगर यानगृह, पश्चिम उपनगरातील सांताक्रूझ यानगृह व पालिका मुख्यालय अथवा मुंबईतील कोणत्याही योग्य ठिकाणीं आवश्यक सुविधांसह ६ नग बॅटरी, चार्जर युनिटचा ३ वर्ष देखभाल सहित पुरवठा आणि स्थापना करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here