@maharashtracity

मुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट रेल्वे स्थानकाला (Churchgate railway station) लागून असलेल्या सब वे गेट क्रमांक ३ येथे आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. त्यामुळे सब वे चा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

प्राप्त माहितीनुसार, चर्चगेट रेल्वे स्थानक येथे दररोज नोकरदार, कर्मचारी, महिला प्रवासी आदींची गर्दी असते. येथील सब वे मध्ये गेट क्रमांक ३ येथे गुरुवारी दुपारी १.४५ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे समजते.

या आगीच्या वृत्ताने चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरात खळबळ उडाली. रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस, बेस्ट व वार्डातील पालिका कर्मचारी, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाने (Fire brigade) तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तात्काळ मदतकार्य सुरू केले.

यावेळी, आगीचा धूर हवेत पसरला होता. दूर अंतरावरून ही आग बघणाऱ्या लोकांना आग चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या ८ मजली कार्यालयीन इमारतीलाच आग लागल्याचा भास झाला. मात्र प्रत्यक्षात ही आग तेथील सब वे मध्ये लागल्याचे समजते.

अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर मदतकार्य करून आगीवर अवघ्या ३० मिनिटांत नियंत्रण मिळवले व आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही.

मात्र, ही आग का व कशी लागली याबाबतची माहिती स्थानिक पोलीस, अग्निशमन दल हे घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here