@maharashtracity

कारवाईसाठी पालिकेची पथके तैनात

मुंबई: मुंबई पालिकेने कोविड नियम मोडणाऱ्यांवर आता सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिकेने विभागवार पथके कार्यरत केली आहेत. त्यामुळे गर्दी टाळा, कोविड नियम पाळा तसेच लसीकरण करून घ्या, असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल (BMC Commissioner IS Chahal) यांनी केले आहे.

कोरोना विषाणूचा ओमिक्रोन (Omicron) हा नवीन प्रकार जगभरात वेगाने पसरत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. मुंबईत ओमिक्रोनचे नवीन रुग्ण आढळत असून त्याचे प्रमाणही वाढते आहे. या नव्या विषाणूला रोखण्यासाठी राज्य सरकार व पालिका यंत्रणा सतर्क झाली आहे.

कोविडची तिसरी लाट (third wave of corona) येऊ नये यासाठी सरकार व पालिका प्रशासन सातत्याने आवाहन करीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.

विशेषतः लग्न समारंभ आणि इतर समारंभांमध्ये नियम मोडले जात असल्याचे आढळत आहे. सर्व नागरिकांनी शासनाने आखून दिलेल्या मर्यादांचे योग्य पालन करावे, कोणत्याही प्रकारची गर्दी टाळावी, मास्क (Mask) लावण्यासह कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, प्रत्येकाने लसीकरण (vaccination) पूर्ण करुन घ्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त चहल यांनी जनतेला केले आहे.

Also Read: कंत्राटदाराची २ कोटींची थकबाकी देण्यासाठी नायर रुग्णालयाच्या निधीवर डल्ला

नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर महानगरपालिकेच्या विभाग कार्यालय स्तरावरील पथकांकडून तसेच पोलीस प्रशासनाकडून सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. चहल यांनी म्हटले आहे की, सर्व जनतेचे सहकार्य, काटेकोरपणे केलेले कोविड व्यवस्थापन आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेला दिलेला वेग यामुळे मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड संसर्ग परिस्थिती आज संपूर्णपणे नियंत्रणात आहे.

मात्र, ओमिक्रोन या नवीन विषाणू प्रकारामुळे जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा परिस्थिती हाताबाहेर गेली असून टाळेबंदीची (Lockdown) परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) अशी स्थिती उद्भवू नये म्हणून अनुक्रमे केंद्र व राज्य सरकारच्या वतीने जनतेला सातत्याने आवाहन करुन खबरदारी घेण्याची विनंती करण्यात येत आहे.

नाताळ – नवीन वर्ष सोहळ्यात गर्दी टाळा

येत्या काही दिवसांमध्ये नाताळ (Christmas) तसेच नवीन वर्षास सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर समारंभ आणि सोहळ्यांचे आयोजन झाल्यास गर्दी होण्याचा धोका आहे. तसेच लग्न व इतर समारंभांच्या आयोजनातून वाढत असलेली गर्दी रोखणे गरजेचे झाले आहे.

एवढेच नव्हे तर, हॉटेल्स (Hotels) आणि उपहारगृह (Restaurant) व इतर सार्वजनिक आस्थापनांमध्ये देखील गांभीर्याने नियम पाळले जात नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

गर्दी टाळण्यासाठी कडक नियम

  • बंदिस्त सभागृहांमध्ये आयोजित होणारे कोणतेही कार्यक्रम, समारंभ, उपक्रम या ठिकाणी त्या सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के व्यक्तिंनाच उपस्थितीची परवानगी असेल.
  • मोकळ्या, खुल्या जागेत होणाऱ्या कार्यक्रम, समारंभ यासाठी जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के एवढ्याच संख्येने उपस्थितीला परवानगी
  • खुल्या, मोकळ्या जागेतील कोणत्याही आयोजनात एक हजारापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येणार असतील तर, त्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला आगावू सूचना देऊन त्याबाबतची पूर्व मंजुरी प्राप्त करणे अत्यावश्यक आहे.
  • सर्व हॉटेल्स्, उपहारगृह, सिनेमागृह, इतर सर्व शासकीय व खासगी आस्थापना आदी सर्व ठिकाणी उपस्थितींच्या नियमांसह कोविड नियम पाळणे बंधनकारक
  • सर्व पात्र नागरिकांनी कोविड लसीचे दोन्ही डोस घेऊन आपले लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसह इतर सार्वजनिक ठिकाणी देखील कोविड लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच योग्य ती मुभा असेल. अन्यथा नियमानुसार कारवाई केली जाईल.
  • सार्वजनिक ठिकाणी, आस्थापनांमध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळाचे तसेच कार्यक्रम – समारंभांमध्ये सर्व उपस्थितांचे लसीकरण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. त्याचे उल्‍लंघन केल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई
  • मुखपट्टी (मास्क) चा योग्यरितीने वापर करणे, हातांची नियमित स्वच्छता राखणे आणि सुरक्षित अंतर राखणे आदी नियमांचे पालन आवश्यक
  • नाताळ, नवीन वर्ष स्वागतासाठी पार्ट्यांचे आयोजन करणे टाळावे, समारंभांमध्ये गर्दी करु नये, कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे बंधनकारक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here