@maharashtracity

५८ रुग्णांना केले स्थलांतरित

मुंबई: मुंबई महापालिकेच्या (BMC) कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital) इमारत क्रमांक १४८ मध्ये शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास एलपीजी टॅंकमधून अचानक गॅस गळती झाली. त्यामुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

रुग्णांमध्ये काहीसे भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र रुग्णालय प्रशासनाने तात्काळ सतर्कता दाखवून इमारतीमधील २० कोरोनाग्रस्त रुग्णांसह (corona patient) ५८ रुग्णांना तात्काळ नजीकच्या दुसऱ्या रुग्णालयीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात आले.

सुदैवाने या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र घटनास्थळी अग्निशमन दलाने (Fire Brigade) व एचपीसीएलच्या (HPCL) तज्ज्ञांनी धाव घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना करून गॅस गळतीवर नियंत्रण मिळविल्याचे समजते. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

प्राप्त माहितीनुसार, पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात इमारत क्रमांक १४८ मध्ये सकाळी ११ वाजेच्या सुमारास एलपीजी गॅस टॅंकमध्ये अचानक गळती लागली. त्यामुळे गॅसचा वास रुग्णालयीन इमारतीत, वार्डात पसरू लागला. त्यामुळे रुग्णालयात खळबळ उडाली.

रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे काहीसे भयभीत झाले. मात्र ही गंभीर बाब तेथील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्या लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तात्काळ या इमारतीमधीत वार्डात दाखल २० कोरोनाग्रस्त रुग्णांसह ५८ रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांसह नजीकच्या रुग्णालयीन इमारतीतील वार्ड क्रमांक २१, २२ मध्ये स्थलांतरित केले.

दरम्यान, या गॅस गळतीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी व एलपीसीजी च्या तज्ज्ञांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अग्निशमन दलाची ३ फायर इंजिन, ३ जंबो वॉटर टँकर, १ हॅजमेट वाहन अशी ९ वाहने घटनास्थळी दाखल झाली आहेत.

अग्निशमन दल, एचपीसीएल व रुग्णालयीन कर्मचारी, सुरक्षारक्षक आदी युद्धपातळीवर मदतकार्य करीत आहेत. पालिका प्रशासनाने या गॅस गळतीचे कारण शोधण्याचे व चौकशीचे आदेश दिल्याचे समजते.

महापौर, उप महापौर यांची भेट व पाहणी

गॅस गळतीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी उप महापौर सुहास वाडकर यांच्यासह तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याची पाहणी केली.

रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळतीनंतर जी तत्परता दाखवली व गॅस गळतीवर नियंत्रण मिळविले त्याबद्दल महापौरांनी रुग्णालय प्रशासन, अग्निशमन दल यांचे कौतुक केले. तसेच, पुन्हा अशी दुर्घटना घडणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे व आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here