@maharashtracity

By Pratik Yadav

नवी मुंबई: गेले काही दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सॅटेलाईट सिटी नवी मुंबई शहर आणि आणि नवी मुंबईकरांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

सलग सहाव्या दिवशी पडणाऱ्या पावसामुळे तसेच हवामान खात्याने जाहीर केलेल्या अतिवृष्टीमुळे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट वाशी, सानपाडा, तुर्भे तसेच ऐरोली आणि रबाळे यासारख्या अनेक ठिकाणी पाणी साचून रस्ते पाण्याने भरले. तसेच रहिवासी भागात जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागला.

एपीएमसी मार्केट (APMC Market), वाशी याठिकाणी भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक भागातून जीवनावश्‍यक वस्तूंची होलसेल दरामध्ये व्यापाऱ्यांकडून खरेदी विक्री होते. परंतु पावसाळ्यापूर्वी या बाजारपेठेतील नाले व गटर सफाई व्यवस्थितरित्या साफ न झाल्यामुळे काही भागात पाणी साचले. त्याचा अनेकांना त्रास झाला.

त्याचप्रमाणे ऐरोली (Airoli), रबाळे (Rabale), वाशी (Vashi), सानपाडा (Sanpada) या ठिकाणीही पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे नवी मुंबईकरांना (Navi Mumbai) अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

जागृत समाजसेवक सुदत्त खरात यांनी सांगितले की पावसाळ्यापूर्वी नवी मुंबईतील नाले, गटारे यांची योग्य तऱ्हेने साफसफाई न झाल्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या गंभीर समस्यावर योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे व जनतेचे हाल होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत. अशीच अतिवृष्टी होत राहिली तर येणाऱ्या दिवसात नवी मुंबई मध्ये आणखीन बिकट परिस्थिती होण्याची शक्यता आहे, असे खरात म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here