@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेचे (BMC) सफाई कामगार लवकरच ‘सिटी ब्युटी फायर’ म्हणून ओळखले जाणार आहेत. पालिका सफाई कामगारांच्या सुरक्षा जॅकेटवर सध्या ‘क्लिन अप’ (Clean Up Marshal) असे लिहिलेले आहे. मात्र शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे (Shiv Sena Corporator Sheetal Mhatre) यांनी केलेल्या मागणीला पालिका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सफाई खात्यातील कामगारांना एक नवीन ओळख मिळणार आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा खात्यात (solid waste department) २८ हजार १८ सफाई कामगार काम करतात. या सफाई कामगारांना देण्यात आलेल्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ असे लिहिण्यात आले आहे.

सन २००६ मध्ये पालिका अतिरिक्त आयुक्त पदावर आर. ए. राजीव हे (IAS R A Rajeev) सनदी अधिकारी कार्यरत असताना त्यांनी सुंदर व स्वच्छ मुंबईसाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असलेला ‘क्लिन अप’ योजनेच्या अंतर्गत काही कडक नियम केले होते. तेव्हापासून पालिका कचरा गाडीवर व पालिका सफाई कामगारांच्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ असे लिहिण्यात येत आहे.

हे सफाई कामगार गटारे, मलनि:सारणाची कामे करतात. रस्ते, चौकातील आणि सार्वजनिक ठिकाणी पडलेला कचरा गोळा करून शहर स्वच्छ ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे मुंबई शहराची ओळख स्वच्छ शहर, कचरा गोळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याचे काम हे सफाई कामगार करतात.

मात्र समाजात त्यांच्याकडे अपेक्षित आदराच्या भावनेने बघितले जात नाही. त्यामुळे सिक्कीम (Sikkim) राज्यात ज्याप्रमाणे सफाई कामगारांना ‘ब्युटी फायर’ म्हणून संबोधले जाते त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांना ‘ सिटी ब्युटी फायर’ म्हणून संबोधण्यात यावे.

त्यासाठी या सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या गणवेशावर व सुरक्षा जॅकेटवर ‘सिटी ब्युटी फायर’ (City Beauty Fire)असे लिहिण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी २०१८ मध्ये ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती. त्यास नगरसेविका व आताच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी अनुमोदन दिले होते.

त्यानंतर हा ठराव मंजूर झाला व तो पालिका आयुक्त यांच्याकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आला होता. मात्र ३ वर्षानंतर त्यावर पालिका आयुक्त यांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे.
तसेच, सफाई कामगारांच्या सुरक्षा जॅकेटवर ‘क्लिन अप’ ऐवजी ‘सिटी ब्युटी फायर’ असे लिहिण्यात येईल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here