@maharashtracity

मुंबई: मुंबईत (Mumbai) पावसाळ्यात दरड, घरे कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत. त्यामुळे जीवित व वित्तीय हानी होत आहे. हे कमी होते की काय आता रस्तेही खचायला लागले आहेत. मुलुंड (Mulund) येथे शुक्रवारी सकाळच्या सुमारास जीएसएस मार्ग येथे १० फूट रस्ता खचल्याची घटना घडली. सुदैवाने कोणत्याही वाहनाचा अपघात झाला नाही अथवा कोणी पादचारी त्या खड्ड्यात पडून जखमी झाला नाही.

मात्र, या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असावे म्हणूनच ही दुर्घटना घडली असल्याची चर्चा मुलुंडकरांमध्ये ऐकायला मिळाली. दरम्यान, ही घटना का व कशी काय घडली, याबाबत पालिका रस्ते विभागामार्फत चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत वर्षभरात कुठे ना कुठे तरी रस्ता, दरड खचण्याच्या दुर्घटना घडत असतात. मुलुंड येथील रस्ता खचल्याची दुर्घटना ही भाजपचे नगरसेवक नील सोमय्या (BJP Corporator Neil Somaiya) यांच्या विभागात घडली आहे. रस्त्यावर रहदारी कमी असताना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही रस्ता खचण्याची दुर्घटना घडली. त्यामुळे रस्त्याला मोठा खड्डा पडला. मुलुंडकरांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आश्चर्य व्यक्त केले.

मात्र, रस्ता खचलेला परिसर बॅरिकेड्स लावून तेवढयापुरता रहदारीसाठी बंद करण्यात आला. तर पालिकेच्या रस्ते विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले असून रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण होईल, असे रस्ते विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here