@maharashtracity

तिसऱ्या आठवड्यात कोविड रुग्णसंख्या २० हजारावर पोहोचेल?

मुंबई: मुंबईत कोविड बाधित रुग्णांच्या (covid patients) संख्येत दररोज २० टक्के ते ३० टक्के वाढ होत आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्यावाढ अशीच सुरू राहिल्यास येत्या १५ – १६ जानेवारीपर्यंत कोविड रुग्णांची संख्या २० हजारापर्यंत जाण्याची शक्यता पालिकेला वाटत आहे. महापौर व पालिका आयुक्तांच्या सुतोवाचाप्रमाणे रुग्ण संख्या २० हजारावर गेल्यास सरकारकडून लॉकडाऊनची (lockdown) घोषणा होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. यासंदर्भातील माहिती पालिका तज्ज्ञांकडून मिळाली आहे.

येत्या एक – दोन दिवसात राज्य सरकार व पालिका आरोग्य यंत्रणा (Health department of BMC), तज्ज्ञांकडून कोविडच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात येणार असून त्यानंतरच योग्य निर्णय घेण्यात येणार आहे.

मुंबईत गेल्या २४ तासात कोविडबाधित रुग्णांची संख्या १५ हजारावर गेली आहे. दिवसेंदिवस या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. काही प्रमाणात रुग्ण बरे होत आहेत. मात्र, रुग्णवाढीचा वेग पाहिल्यास १५ – १६ जानेवारीपर्यंत रुग्णांची संख्या २० हजारांचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकार व पालिकेला मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊनची तयारी करण्याची गरज भासू शकते.

३० हजार बेड्स ; सध्या १८ टक्केच रुग्ण

मुंबईत कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता कोविडच्या तिसऱ्या लाटेची (third wave of covid) सुरुवात झाल्यात जमा आहे. मात्र पालिकेने कोविडच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी विविध रुग्णालये, जम्बो कोविड सेंटरमध्ये (Jumbo covid centres) सध्या ३० हजार बेड्स (beds) तयार ठेवल्या आहेत. सध्या त्यापैकी १८ टक्के बेड्स रुग्णांसाठी वापरले जात असून उर्वरित ८२ टक्के बेड्स रिकाम्या आहेत.

पुढे रुग्ण संख्या जास्त प्रमाणात वाढल्यास व बेड्सची तशी आवश्यकता भासल्यास बेड्सच्या संख्येत आणखीन २ ते ५ हजाराची वाढ करण्याची पालिकेची तयारी आहे. त्यासाठी खासगी रुग्णालये, खासगी मोकळ्या जागा ताब्यात घेऊन त्याचा वापर केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

८९ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत, ५ टक्के रुग्णच रुग्णालयात

मुंबईत गेल्या २४ तासात कोविडबाधित रुग्णांची संख्या तब्बल १५ हजारांवर गेली आहे. मात्र दररोज आढळून आलेल्या कोविड रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांमध्ये कोविडची लक्षणेच (asymptomatic) आढळून येत नाहीत. तसेच, फक्त ५ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागत आहे. तर फक्त १ टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची (oxygen) आवश्यकता भासते, अशी माहितीही तज्ज्ञांनी दिली आहे.

रुग्णांना बेड्स, ऑक्सिजन कमी पडू देणार नाही -: अतिरिक्त आयुक्त

मुंबईत जरी कोविड रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असली तरी रूग्णालयात दाखल रुग्णांची दररोजची सरासरी ५ टक्के एवढीच आहे. तर पालिकेकडे सध्या ३० हजार बेड्स उपलब्ध असून ऑक्सिजनचा साठा पुरेल इतका आहे. त्यामुळे रुग्णांना कोणत्याही परिस्थितीत बेड्स व ऑक्सिजन यांची कमतरता भासू देणार नसल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले.

सध्या पालिकेकडे रुग्णांसाठी २३० मे. टन इतका ऑक्सिजन साठा जमा आहे. आवश्यकता भासल्यास ऑक्सिजन साठ्याचे प्रमाण तिपटीने वाढविण्याची क्षमता आहे, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here