@maharashtracity

२७ जणांना धुराची बाधा

मुंबई: कांदिवली (प.) येथे म्हाडाच्या इमारतीमधील (Mhada building) लाईट मिटर बॉक्समध्ये मंगळवारी सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे व आगीच्या धुरामुळे इमारतीमध्ये अडकलेल्या ५० – ६० लोकांची स्थानिक शिवसैनिक, नागरिक व अग्निशमन दलाने वेळीच सुटका केल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र त्यापैकी २२ जण रूग्णालयात उपचार घेत असून त्यापैकी १३ जणांची प्रकृती गंभीर आहे.

यासंदर्भातील माहिती पालिका सूत्र व शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका गीता भंडारी (Shiv Sena Corporator Geeta Bhandari) यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली आहे.

प्राप्त माहितीनुसार, कांदिवली (प.), छत्रपती शिवाजी महाराज संकुल म्हाडा वसाहत येथील तळापासून ८ मजली असलेल्या १० नंबरच्या बिल्डिंगमधील जीर्ण अवस्थेतील इलेक्ट्रिक मिटर बॉक्समध्ये मंगळवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन केबल वायरिंगला आग लागली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात काळा धूर निर्माण झाला व इमारतीत पसरला.

या आगीच्या घटनेची माहिती मिळताच इमारतीत राहणाऱ्या राहिवाशांमध्ये खळबळ माजली. अनेकजण भयभीत झाले. अनेकांनी जिवाच्या भीतीने इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. तर लहान मुले, महिलांसह ५० – ६० जण इमारतीमध्येच विविध मजल्यांवर अडकून पडले.

याबाबतची खबर स्थानिक नागरिक, शिवसैनिकांपर्यंत (Shiv Sainik) पोहोचली व त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अग्निशमन दल (Fire Brigade) मदतीला पोहोचण्यापूर्वीच बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात केली. तोपर्यंत अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले व त्यांनीही बचावकार्याला सुरुवात केली. त्यामुळे या ५० – ६० जणांना वाचविण्यात यश आले.

मात्र नाकातोंडात आगीचा काळाकुट्ट धूर गेल्याने (suffocation) २७ जणांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २२ जणांना नजीकच्या जुन्या शताब्दी रुग्णालयात (Shatabdi Hospital) दाखल करण्यात आले असून त्यापैकी गंभीर ९ जणांना ‘आयसीयू’ विभागात ठेवण्यात आले आहे.

तर आणखीन ५ जणांना नजीकच्या ‘ऑस्कर’ या खासगी रुग्णालयात (Oscar Hospital) दाखल करण्यात आले असून त्यापैकी गंभीर ४ जणांना ‘आयसीयू’ (ICU) विभागात ठेवण्यात आले आहे.

याबाबत, आमच्या प्रतिनिधींनी संपर्क साधला असता शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका गीता भंडारी यांनी, या घटनेत अद्याप कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे सांगितले. मला घटनेची माहिती मिळताच मी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच, या घटनेत नाकातोंडात आगीचा धूर गेल्याने २७ जणांना रुग्णालयात दाखल केले असे सांगितले.

तसेच, आमच्या शिवसैनिकांनी जीव धोक्यात घालून अनेकांना मदत केली. मी स्वतः दोन्ही रुग्णालयात भेट दिली व चौकशी केली. रुग्णालयात दाखल २७ जणांमध्ये ३ -४ लहान मुलांचा, काही महिलांचाही समावेश असल्याचे नगरसेविका गीता भंडारी यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

या घटनेप्रकरणी स्थानिक पोलीस, अग्निशमन दल व म्हाडा अधिकारी यांच्याकडून तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here