@maharashtracity
गोरेगाव येथे अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
मुंबई: गोरेगाव पश्चिम येथील उन्नत नगर या परिसरात होत असलेला दुधाच्या (Adulterated milk) भेसळीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने रंगेहाथ पकडला आहे. प्रशासनाने केलेल्या कारवाईत १२१ लीटर साठा नष्ट करण्यात आला असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिली आहे. नष्ट केलेल्या साठयाची किंमत ५ हजार ७१० असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईकरांना दर्जेदार सुरक्षित व भेसळमुक्त दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने मागील काही महिन्यांपासून कंबर कसली आहे. परराज्य व इतर जिल्ह्यातून येणारे दूध हे योग्य व दर्जेदार असून मुंबईत काही ठिकाणी दूधाची भेसळ रोखण्याकरीता धाडसत्र सुरु करण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव (Goregaon) पश्चिम येथील उन्नत नगर, तीन डोंगरी या परिसरातील प्रेम नगर रहिवासी सुधार येथील दूध विक्रेता सैदुलू बाकंया कम्मपाटी हे अमूल ब्रॅण्डचे १ ली व अर्धा लीटर दूधाचे पॅकेट्स फोडून त्यामध्ये पाणी टाकून ते परत सील करुन विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे, मंगळवारी पहाटे साडे चारच्या सुमारास अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून सैदुलू कम्मपाटी याला दूध भेसळ करत असताना, रंगेहाथ पकडले. यावेळी दूधाचे दोन नुमने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.
याशिवाय गोरेगाव पोलीस ठाण्यात आरोपी सैदुलू बाकंया कम्मपाटी याच्या विरोधात भा.द.वि कलम २७२,२७३,४२० सह अन्न सुरक्षा व मानदे कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.