@maharashtracity

सुर्योदयानंतरही धुक्याचे साम्राज्य

मुंबई: राज्याला अवकाळी पावसाने सतावले असतानाच आजच्या ५ डिसेंबर या महिन्यातील पहिल्या रविवारीच मुंबईवर धुक्याची दुलई (fog) पसरली होती. थंडीत हवेतील धूलिकण वातावरणात सहज हलू शकत नसल्याने ते एकाच जागी स्थिरावतात. हे चित्र थंडीच्या दिवसांत वारंवार दिसून येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, दिवस उगवल्यानंतरही धुके कायम होते. यातून महिन्याच्या पहिल्याच रविवारी हिवाळी मोसमाचा अनुभव घेण्यात मुंबईकर रंगले.

रविवारी मुंबईवर पसरलेल्या धुक्याच्या बाबतीत बोलताना मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, थंडीत हवेतील धूलिकण इतरत्र हलत नाहीत. परिणामी ते एकाच जागी स्थिरावतात. त्यामुळे धुक्याची चादरच जणू तयार होते. हे चित्र थंडीच्या दिवसांत वारंवार दिसून येणारे आहे.

रविवारी मुंबईतील कमाल आणि किमान तापमानातील वाढ कायम होती. रविवारी कुलाब्यात कमाल तापमान ३०.६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२.८ अंश सेल्सिअसवर नोंदविण्यात आले. सांताक्रूझमध्ये कमाल तापमान ३२.३ तर किमान तापमान २२ अंशावर होते असल्याचे सांगण्यात आले.

शहर आणि उपनगर दोन्ही ठिकाणी आर्द्रतेत घट झाल्याने दुपारी बारानंतर केवळ लख्ख सूर्यप्रकाश मुंबईकरांना अनुभवता आला. कुलाब्यात आर्द्रता ६५ टक्के तर सांताक्रूझमध्ये ६३ टक्क्यांवर होती. त्यामुळे सूर्यप्रकाशातही घामांचा धारांपासून मुंबईकरांची सुटका झाली.

मुंबईतील हवेची गुणवत्ताही ९२ टक्क्यांवर नोंदवल्याची माहिती ‘सफर’ प्रणालीच्या माध्यमातून दिली गेली. आगामी दोन दिवसाच्या अंदाजात म्हणजेच सोमवार दिनांक ६ डिसेंबर रोजी मुंबईतील कमाल तापमान ३३ किमान २२ अंश सेल्सिअसवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली. आकाश मात्र ढगाळ राहणार असल्याचे सांगण्यात आले.

तर मंगळवारी ७ डिसेंबर रोजी कमाल तापमानात एक अंशाने वाढ म्हणजे ३४ तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअसवर नोंद होण्याची शक्यता वर्तविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here