@maharashtracity

रुग्णालय प्रशासनाने आरोप फेटाळला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील (Nair Hospital) शवागृहात मृतदेह अक्षरशः जमिनीवर एकमेकांवर ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समाजमाध्यमांवर प्रसारित झाला.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली (RTI activist Anil Galgali) यांनी फेसबुक या समाज माध्यमावर मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मुंबई सेंट्रल येथील नायर पालिका रुग्णालयातील शवागृहातील (mortuary) स्थिती छायाचित्र प्रसिद्ध केली. हे मृतदेह एकमेकांवर ठेवलेले असल्याचे दिसून येत असल्याने मरणानंतरही मृतदेहांची हेळसांड होत असल्याचे समोर आले.

मात्र ही छायाचित्र समाज माध्यमावर प्रसिद्ध झाल्यावर नायर रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला की शवागृहाची नियमित दुरुस्ती होत असताना काही कालावधीसाठी मृतदेह कप्प्याबाहेर काढून पुन्हा ठेवले जात आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नायर रुग्णालयावर आरोप करत ही छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारीत केली. रुग्णालयाच्या शवागृहातील शीतकालीन यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याने बेवारस मृतदेहांची योग्य पद्धतीने काळजी घेत नसल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच हे मृतदेह कित्येक महिने शवागृहात व्यवस्थित सांभाळले जात नसल्याने रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

रुग्णालयात दाखल होणाऱ्या अनोळखी व इतर मृतदेहांना शवागारातील शीतगृहात योग्य पद्धतीने ठेवले जाते. अनोळखी मृतदेहांची ओळख पटवून विल्हेवाट लावण्याची जबाबदारी पोलिसांकडून पार पाडली जात असल्याचे नायर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, अनेकदा मृतदेहाची ओळख पटण्यात उशिर होत असल्याने मृतदेह दोन ते तीन महिने शवागृहातच राहतात. यातून एकही कप्पा रिकामा नसल्यास यंत्रणेवर ताण येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच नियमित दुरुस्तीच्या कामासाठी मृतदेह कप्प्याबाहेर काढले जातात. पुन्हा ते कप्प्यात ठेवताना कर्मचाऱ्यांची कसरत होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

बेवारस मृतदेहांची ओळख लवकरात लवकर पटवून घेण्यासाठी तसेच परत पोलिसांनी घेऊन जावेत, यासाठी रुग्णालय प्रशासन सातत्याने संबंधित पोलिस ठाण्याशी पाठपुरावा करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शवागर शीतगृहाची नियमित दुरुस्ती करत असताना आणि ओळख पटलेले मृतदेह घेऊन जाण्याची कार्यवाही सुरु असताना अज्ञात व्यक्तीने गैरहेतूने मृतदेहांचे फोटो काढलेत. समाजमाध्यमांवर संबंधित प्रकरणाबाबत दिलेली माहिती चुकीची आहे.

महानगरपालिका व नायर रुग्णालय प्रशासनाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न असून, रुग्णालयाच्या कामगिरीवर जनतेने विश्वास ठेवावा, असे आवाहन नायर रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here