@maharashtracity

पालिका आयुक्तांचे फर्मान

लसीचे दोन डोस घेतल्यांनाच परवानगी

सहा फुटांचे अंतर राखणे बंधनकारक

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी, थर्टी फर्स्ट, लग्न समारंभ, पार्टी, राजकीय कार्यक्रम आदी प्रसंगी जर २०० लोकांची गर्दी होणार असेल तर तेथील सहाय्यक आयुक्त यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. अशा कार्यक्रमात उपस्थित राहणाऱ्या नागरिकाने लसीचे दोन डोस घेणे आणि दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटांचे अंतर ठेवणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

मुंबईत अद्यापही कोविडचा संसर्ग (covid pandemic) सुरूच आहे. आगामी काळात कोविडची तिसरी लाट (third wave of covid) येण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त होत असल्याने या अटी घालण्यात आला आहेत. यासंदर्भात आयुक्तांनी सुधारित नियमावली जारी केली आहे.

मुंबईत कोविडचा संसर्ग नियंत्रणात आला असला तरी गेल्या काही दिवसात जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोविड -१९ चा नवीन प्रकारचा विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’ ची (Omicron) बाधा झालेले २३ रुग्ण मुंबईत आढळून आल्याने पालिका यंत्रणा व खुद्द आयुक्तसुद्धा काहीसे धास्तावले आहेत.

मुंबईत दरवर्षी ‘थर्टी फर्स्ट’ (New Year welcome parties) गल्लीबोळापासून ते पॉश सोसायटी, पंचतारांकित हॉटेल्स, हॉल आदी ठिकाणी जल्लोषात साजरा केला जातो. यानिमित्ताने खूप मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी होते. मद्यधुंद अवस्थेत बेताल नाचणे होते. त्यामुळे या गर्दीत कोविडचा संसर्ग झाल्यास मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

तसेच, या दिवसात लग्न समारंभही (marriage ceremony) होत असल्याने आणि खासगीत पार्ट्या होत असल्याने आयुक्तांनी ही बाब खूपच गांभीर्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय मिटिंग, सभा (political gatherings) घेतल्यास त्यांनाही पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांची मोठी गर्दी होऊ शकते.

त्यामुळे पालिका आयुक्त यांनी, किमान २०० जणांची गर्दी एखाद्या कार्यक्रमाला होणार असेल तर आयोजकांनी पालिका वार्डातील सहाय्यक आयुक्त यांची लेखी परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

मात्र पालिकेची नजर चुकवून कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यावर पोलीस व पालिका यांच्यामार्फत कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

पालिकेची सुधारित नियमावली

थर्टी फर्स्ट पार्ट्या, कार्यक्रम, लग्नसमारंभ, राजकीय वा खासही बैठका, खासगी कार्यक्रम बंदिस्त जागेत असल्यास ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असणार आहे.

असे कार्यक्रम एखाद्या मैदानात, खासगी मोकळ्या जागेत कार्यक्रम असेल तर २५ टक्के उपस्थितिची मर्यादा असून दोन व्यक्तींमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असणे बंधनकारक असेल.

कोविडच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल.

आयोजकांनी कार्यक्रम स्थळी अधिक गर्दी होणार नाही, याची काळजी, खबरदारी घेणे आवश्यक असेल.

नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर साथरोग नियंत्रण (pandemic act) कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here