@maharashtracity

अतिक्रमणे हटविल्याने उड्डाणपुलासाठी जागा उपलब्ध

मुंबई: पूर्व व पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता (लिंक रोड) (Goregaon – Mulund Link road) बांधकामामध्ये अडथळा ठरलेलली ३५ अतिक्रमणे (encroachment) पालिका वार्ड कार्यालयामार्फत कारवाई करून हटविण्यात आली आहेत. त्यामुळे प्रकल्पातील प्रस्तावित उड्डाणपुलाच्या (flyover) बांधकामासाठी जागा उपलब्ध झाली असून प्रकल्प निर्मितीलाही वेग मिळणार आहे.

आतापर्यंत पी/दक्षिण विभाग हद्दीतील एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्त्यांपैकी २,१५० मीटर रस्त्यावरील अतिक्रमित बांधकामे हटवण्यात आली आहेत.

मुंबईत वाहतूक समस्या गंभीर आहे. शहर व उपनगरात वाहतूक कोंडीमुळे वाहन मालक, चालक यांना मोठया प्रमाणात त्रास होत असतो. तसेच, पादचारी नागरिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी समस्येतून दिलासा देण्यासाठी गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता हा अत्यंत महत्वाचा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे. मात्र या प्रकल्पाच्या निर्मितीमध्ये अडथळा ठरणारी एकूण १०१ अतिक्रमणे निश्चित करुन कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती.

पालिकेच्या पी/ दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील १५० फूट रुंदीच्या जनरल अरुणकुमार वैद्य मार्गाच्या दक्षिणेकडील व चित्रनगरी (फिल्मसिटी) रस्त्याच्या पश्चिमेकडील अशा एकूण २,२४० मीटर लांबीच्या रस्ता रेषांमध्ये ही अतिक्रमणे होती. त्यापैकी, पहिल्या टप्प्यात जनरल अरुणकुमार वैद्य मार्गावरील ५२ अतिक्रमित बांधकामे २ वर्षांपूर्वी काढली होती.

आता दुसऱ्या टप्प्यात ३५ अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्याची कारवाई पी/दक्षिण विभागाने २१ ऑक्टोबर रोजी पूर्ण केली. या कारवाईमुळे २१० मीटर लांबीची रस्त्याच्या पश्चिमेकडील बाजूची जागा गोरेगाव – मुलुंड जोडरस्ता रुंदीकरणासाठी उपलब्ध झाली आहे.

या जागेत सिमेंट काँक्रिट व डांबरीकरणाचा रस्ता तसेच पर्जन्य जलवाहिन्या बांधण्याचे काम गोरेगांव – मुलुंड जोडरस्ता विभागामार्फत त्वरित सुरू करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाचा भाग म्हणून जनरल अरुणकुमार वैद्य रस्ता ते चित्रनगरी (film city) रस्ता असा १.२९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल रत्नागिरी हॉटेल चौकात प्रस्तावित आहे. हा उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ३ असा एकूण ६ मार्गिकांचा असेल. या उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी देखील आता जागा उपलब्ध झाली आहे.

हा उड्डाणपूल तसेच मुलुंडमधील उड्डाणपूल बांधकामासाठी एकत्रित निविदा मागवून पात्र निविदाकारांची निवड करण्यात आली आहे. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पूर्ण होऊन लवकरच उड्डाणपुलाचे बांधकाम देखील सुरु होणार आहे.

पालिकेने उपायुक्त राजन तळकर, प्रमुख अभियंता (पूल) सतीश ठोसर, पी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधीत विभागांनी समन्वय साधून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही पूर्ण केली.

दोन जेसीबी संयंत्रांच्या सहाय्याने परिरक्षण विभागातील सहाय्यक अभियंता तांबे, दुय्यम अभियंता धर्माधिकारी व कनिष्ठ अभियंता येडले यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चित्रनगरी मार्गावरील ही ३५ अनधिकृत बांधकामे काढली.

ही कारवाई करताना दिंडोशी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांबळे, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह २५ पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपस्थित होत अखेरची शिल्लक १४ अतिक्रमित बांधकामे लवकरच प्राधान्याने काढण्यात येऊन रस्ता रुंदीकरण करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here