@maharashtracity

गर्दी रोखण्यासाठी तिकीट न देण्याचा निर्णय
१५ ऑगस्टपासून अंमलबजावणी
२ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, ओळखपत्र आवश्यक
क्यूआर कोडची गरज नाही
३ सेकंदात लसीच्या प्रमाणपत्राची पडताळणी, मासिक रेल्वे पास

मुंबई: दिनांक १५ ऑगस्टपासून उपनगरीय रेल्वे प्रवास करण्यासाठी सामान्य नागरिकांना जवळच्या रेल्वे स्थानकात त्यांनी लसीचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र, सोबत आधारकार्ड (Aadhaar card), ओळखपत्र सादर केल्यास तेथील पालिका कर्मचारी त्यांना प्राप्त लिंकच्या आधारे फक्त ३ सेकंदात त्याची सत्यता पडताळून रेल्वे प्रवास करण्यासाठी मासिक पास व प्रमाणपत्र देतील. त्या आधारेच त्यांना प्रवास करता येणार आहे.

मात्र कोरोनाच्या (corona) तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता गर्दी टाळण्यासाठी सामान्य नागरिकांना अगदी लसीचा १ डोस घेतला असेल तरी कोणत्याही परिस्थितीत रेल्वेची तिकिटे देण्यात येणार नाहीत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, नागरिक यांनाच पूर्वीप्रमाणे रेल्वे तिकीट देण्यात येणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

तसेच, मुंबईतील (Mumbai) ५३ रेल्वे स्थानकात ३५८ खिडक्यांवर व मुंबई बाहेरील एमएमआर रिजनमधील (MMR Region) ५० रेल्वे स्थानकातील खिडक्यांवर तेथील पालिका कर्मचारी लसीचे २ डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे मासिक पास देतील. यासंदर्भातील प्रक्रिया सकाळी ७ पासून ते रात्री ११ पर्यन्त दोन सत्रांत करण्यात येणार आहे.

क्यूआर कोडची गरज नाही

सामान्य नागरिकांना रेल्वे प्रवास करण्यासाठी आवश्यक रेल्वे पास, प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सध्या तरी ‘क्यूआर कोड’ ची (QR code) गरज ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे क्युआर कोडचा विषय राहिलेलाच नाही. परवानगीची प्रक्रिया ही अगदी सुटसुटीत व सुलभ प्रक्रिया असणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

…तर फौजदारी कारवाई

रेल्वे प्रवासासाठी जर कोणी लसीचे २ डोस घेतल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचे सिद्ध झाल्यास त्या दोषी व्यक्तीवर नियमाने पोलिसांमार्फत फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here