@maharashtracity

२ अग्निशमन कर्मचार्यांना आयुक्त शौर्य पदक

मुंबई: आपत्कालीन घटनांमध्ये अतुलनीय, साहसी, धडाकेबाज कामगिरी करणारे मुंबई अग्निशमन दलाचे (Mumbai Fire department) उपायुक्त प्रभात रहांगदळे, अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी हेमंत परब, विभागीय अग्निशमन अधिकारी आत्माराम मिश्रा, सहाय्यक विभागीय अग्निशमन अधिकारी कृष्णत यादव यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे मुंबई अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी अनिल पवार, अग्निशामक उत्तम राठोड यांना पालिका आयुक्त शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत मुंबईतील दीड कोटीहुन अधिक मुंबईकर (Mumbaikar), त्यांचे घर, खासगी कार्यालये, सरकारी, पालिका कार्यालये, सार्वजनिक मालमत्ता आदींचे प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून संरक्षण करण्याचे व जिवीत आणि वित्तीय हानी रोखण्याचे काम मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire department) करते.

मुंबईतील प्रसिद्ध फोर्ट विभागातील मिंट रोड परिसरात १६ जुलै २०२० रोजी भानुशाली इमारतीची पडझड झाल्याची मोठी दुर्घटना घडली होती. सदर दुर्घटनेत १५ जण इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकले होते तर अन्य १२ जण इमारतीच्या अन्य एका भागात अडकून पडले होते.

या दुर्घटनेप्रसंगी जीवाची बाजी लावून अग्निशमन दलाच्या वरील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी अनेकांचे प्राण वाचवले होते. त्यांच्या या साहसी कामगिरीची दखल मुंबई महापालिकेसह राज्य सरकार व केंद्र सरकारने घेतली. त्यानुसार वरील सहा अधिकारी व कर्मचारी यांच्यापैकी ४ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पदक तर एक अधिकारी, एक कर्मचारी अशा दोघांना पालिका आयुक्त शौर्य पदक जाहीर करण्यात आले आहे.

आम्ही गेल्या अनेक वर्षात अग्निशमन दलात आपले कर्तव्य बजावत असताना जी काही साहसी कामगिरी केली त्याची दखल घेऊन राष्ट्रपती पदक आम्हाला जाहीर झाले, याचा मनस्वी आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here