@maharashtracity

पालिका विकसित करतेय मोबाईल अँप

मुंबई: मुंबईत सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, लघुशंका करणे, मस्कचा वापर न करणे, मास्क तोंडावर न लावणे आदी प्रकरणी पालिकेने नेमलेल्या ‘क्लिनअप मार्शल’ मार्फत (clean up Marshal) संबंधितांवर दंडात्मक कारवाई करताना होत असलेल्या ‘चिटिंग’ ला चाप लावण्यासाठी पालिका यंत्रणा ‘ऑनलाईन’ दंड वसुलीची पद्धत अंमलात आणणार आहे. यासाठी अत्याधुनिक मोबाईल अँप विकसित करण्यात येत आहे. (BMC is developing mobile app to collect fine online)

त्यामुळे आता ‘क्लिनअप मार्शल’च्या वरकमाईचे मार्ग बंद होणार आहेत. सर्वसामान्य व्यक्तीला, दुकानदार, व्यापारी आदींना काही न काही कारणास्तव क्लिनअप मार्शलकडून दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते.

तसेच, दंडात्मक कारवाई करताना क्लिनअप मार्शल ‘हात की सफाई’ दाखवत आपले खिसे गरम करीत असल्याच्या अनेक तक्रारी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांच्याकडून करण्यात आल्या आहेत. पालिका सभागृहात, स्थायी समितीच्या बैठकीतही नगरसेवक या क्लिनअप मार्शलांच्या मनमानी कारभाराबाबत आरोप करतात. तसेच, सदर उर्मट क्लिनअप मार्शलवर कडक कारवाईची मागणी करतात.

तसेच, अनेकदा क्लिनअप मार्शल व नागरिक यांच्यात वादविवाद, हाणामारी अशा घटना घडत असतात.

सध्या विना मास्क नागरिकांवर क्लिनअप मार्शलमार्फत मोठया प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मात्र दंडाच्या रकमेत हेराफेरी होत असल्याचा आरोप होत असल्याने व तशी प्रकरणे समोर आल्याने पालिकेने त्याची गंभीर दखल घेत उपाययोजना सुरू केली आहे.

विनामास्क फिरणाऱ्यांकडून आता रोख २०० रुपये दंड न घेता ऑनलाइन दंड घेतला जाणार आहे. या दंडाची पावतीही संबंधित व्यक्तीला त्याच्या ‘विनामास्क फोटोसह’ मोबाईलवर पाठवली जाणार आहे. सिग्नल तोडणाऱ्या गाड्यांना ज्याप्रमाणे नियम मोडल्याच्या दंडाचा मेसेज जातो त्याच धर्तीवर हे अँप विकसित केले जात आहे.

तसेच, दंडाची पावतीही मोबाईलवर पाठवली जाईल. दंड किती दिवसांत भरावा, दंड भरला नाही तर कशी कारवाई करायची याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.

यामध्ये क्लीनअप मार्शलला त्याचा विभागही निश्चित करून दिला जाणार आहे. त्यामुळे तो त्या विभागाच्या बाहेर जाऊन बेकायदेशीर कारवाई करू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here