@maharashtracity

रु १५ कोटींचा खर्च

शहर व उपनगरे येथील ५० स्मशानभूमींची स्वछता राखणार

एकाच कंत्राटदाराला ४६% कमी दराने कंत्राट

मुंबई: केंद्र सरकार एकीकडे रेल्वे, विमानतळ आदीं ठिकाणी खासगी सेवा घेत असताना दुसरीकडे मुंबई महापालिकेनेही (BMC) रुग्णालये, बेस्ट आदी ठिकाणी खासगी सेवा घेणे सुरू केले आहे. आता मुंबईतील स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदारांची नेमणूक केली आहे.

मुंबई शहर व उपनगरे भागातील ५० स्मशानभूमीच्या ठिकाणी “स्वच्छ भारत अभियान प्रबोधन” (Swatch Bharat Abhiyan) अंतर्गत स्वच्छता राखणे व त्यासाठी यंत्रसामग्री, मनुष्यबळ पुरवठा करणे आदी कामांसाठी एकाच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

या कंत्राटदाराने ४६% कमी दरात पुढील ३ वर्षे काम करण्याचे मान्य केले आहे. या कामासाठी पालिका या कंत्राटदाराला तब्बल १५ कोटी १७ लाख ३१ हजार ६९० रुपये मोजणार आहे.

वास्तविक, पालिकेने या कामासाठी २८ कोटी १७ लाख ८७ हजार ६५० रुपये इतका खर्च अंदाजित धरला होता.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

या प्रस्तावात कंत्राटदाराने ४६.१५% कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवल्याने कामाच्या दर्जावरून विरोधी पक्ष अथवा पहारेकरी भाजपकडून आक्षेप घेतला जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मुंबई शहर भागातील ९, पश्चिम उपनगरे भागातील २५ आणि पूर्व उपनगरातील १६ अशा एकूण ५० स्मशानभूमीच्या ठिकाणी कंत्राटंदाराने मनुष्यबळ, यंत्रसामग्री यांचा वापर करून समशानातील विद्युतदाहिनी, दहन जागा लोखंडी चीता / वेधी मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यापूर्वी व अंतिम संस्कार झाल्यावर स्वच्छता राखणे, मृतदेहावरील हार, फुले आदींची विल्हेवाट लावणे, प्रार्थना कक्ष, सभागृह येथील स्वच्छता राखणे, दफनभूमींची स्वच्छता राखणे व तेथील गवत, रानटी वनस्पती, हाडे ठेवण्यासाठी विहिरीचे रखरखाव ठेवणे, जीवखडयाच्या साठ्याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना देणे, स्मशानातील मोकळी जागा, इतर जागा यांची स्वच्छता राखणे हे काम करणे अपेक्षित आहे.

याशिवाय, प्रसाधनगृह, मुतारी यांची स्वच्छता राखणे, दरवाजे, खिडक्या यांची स्वच्छता राखणे, पंखे, ट्युबलाईट, इलेक्ट्रिक उपकरणे यांची स्वच्छता राखणे, पाण्याच्या टाकीची स्वच्छता ठेवणे, मृत्यू नोंदणी कार्यालयात स्वच्छता ठेवणे, प्रवेशद्वार, कार्यालयीन गच्ची, पायवाटा, पिण्याची पाणपोई आदी ठिकाणी कंत्राटदाराने स्वच्छता ठेवण्याचे काम करायचे आहे. जर नियमांचे व कराराचे उल्लंघन केल्यास कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here