@maharashtracity

तिसऱ्या लाटेपासून सावध राहण्याचा तज्ज्ञांचा इशारा

मुंबई: मुंबईत दिनांक २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या आठवडा भराच्या कालावधीत एकूण ३ हजार १८७ कोरोना रूग्ण (corona patient) आढळून आले. या तुलनेत २१ ते २७ ऑगस्ट या आठवडाभरात मुंबईत एकूण १,८९३ कोविड रुग्ण आढळले.

या दोन सप्ताहाच्या रूग्ण संख्येकडे पाहिल्यास सुमारे २० टक्क्यांनी रूग्ण वाढ दिसून येत आहे. हे धक्कादायक असून १५ ऑगस्टपासून देण्यात आलेल्या लोकल प्रवास मुभेचा परिणाम आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान कोरोना विषाणूचा २१ दिवसांचा संसर्ग कालावधी (incubation period) याच दरम्यान पूर्ण होत आहे. तिसऱ्या लाटेपासून (third wave of covid) सावध राहण्याचा तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

२१ ते २७ ऑगस्ट या कालावधीत २२ जणांचे मृत्यू झाले. तर याच आठवड्यात मुंबईची एकूण रुग्णसंख्या ७,४०,८७० वरून ७,४२,७६३ वर पोहचली. त्याच वेळी पुढच्या आठवड्यात २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मुंबईत एकूण ३,१८७ रुग्ण आढळले.

म्हणजेच मागील आठवड्याच्या तुलनेत गेल्या सात दिवसांत कोविड रुग्णांमध्ये तब्बल २० टक्के वाढ झाली आहे. मात्र, मुंबईतील रुग्णसंख्येत भर पडत असली तरी शहरात मृतांची संख्या घटली आहे. दैनंदिन सक्रिय रुग्णांचा दर जो गेल्या काही आठवड्यांसाठी १% च्या खाली होता. मात्र ही तिसऱ्या लाटेची सुरुवात नसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले.

यावर दिनांक १५ आगस्टपासून खुला केलेला लोकल प्रवास आणि सण उत्सवात झालेली बाजारातील गर्दी कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच चाचण्यांची संख्या वाढल्याने गेल्या सात दिवसांमध्ये रुग्ण वाढ झाली आहे.

पालिकेच्या आकडेवारीनुसार, दिनांक २१ ते ७ ऑगस्ट दरम्यान, शहरात २,१०,१४० चाचण्या घेण्यात आल्या. तर दिनांक २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान २,५६,२१० चाचण्या घेण्यात आल्या. यातून पॉझिटिव्हीटी दर ०.८८ टक्के आढळून आला. चाचण्या कमी केल्या नसल्याचे पालिका अधिकारी सांगतात.

तर ३ फेब्रुवारी २०२० ते ३ सप्टेंबर २०२१ अशा सुमारे दीड वर्षाच्या कालावधीत शहरात एकूण ९.३ दशलक्ष चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात बाधित दर ७.९४ टक्के एवढा आहे.

यावर बोलताना राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, १५ ऑगस्टपासून रेल्वे सुरू झाली. तसेच, काही नियम देखील शिथिल झाले. त्यामुळे, रुग्णसंख्येत वाढ अपेक्षित होती. परंतु, रूग्ण संख्या ४०० च्या आसपास नियंत्रित करण्याची संधी आहे.

जर कोविड नियमांचे पालन केले नाही तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याला तिसऱ्या लाटेची सुरुवात म्हणता येणार नाही. मात्र, तिसरी लाट दारात उभी टाकली आहे त्यामुळे आपण सावध राहणे देखील गरजेचे आहे, असे डॉ पंडित म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here