@maharashtracity

मुंबई: गेल्या वीस दिवसात सक्रिय रुग्णांची नोंद २४ टक्क्यांनी घटली असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. १ नोव्हेबर रोजी मुंबईत सक्रिय रुग्णांची नोंद ३६८९ इतकी करण्यात आली होती. तर २० नोव्हेंबर रोजी ही नोंद २८०८ इतकी करण्यात आली. यावरुन सण उत्सव आणि गर्दी वाढून देखील मुंबईत सक्रिय रुग्ण कमी होत असल्याचे चित्र आहे.

मुंबईतील पॉझिटीव्हीटी दर १ टक्क्यांहून कमी नोंद होत होता. गुरुवारी तर हा दर ०.८२ टक्के इतका नोंदविण्यात आला. पालिकेने अत्यवस्थेतील कोरोना रुग्णांकडे (corona patients) तसे कोरोना तपासण्या (corona testing) वाढवण्याकडे लक्ष दिला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृत्यू कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, कोरोना वॉर्ड असलेल्या पालिका रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या कोरोना रुग्ण कमी संख्येने येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सण उत्सव सुरु झाले असून लोकांचा प्रवासही वाढला आहे.

शिवाय एकमेकात मिसळणे, कार्यालयीन उपस्थिती वाढणे, बाजारातील गर्दी वाढत असून देखील रुग्णसंख्या कमी होत आहे. शिवाय सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होत असल्याचे त्या अधिकाऱ्याने मत व्यक्त केले.

Also Read: तृतीयपंथीयांची पालिकेकडून आरोग्य तपासणी

मात्र, कोणत्याही सण उत्सवानंतर गर्दीतील संसर्ग निरीक्षणासाठी २१ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. अजून आठ दिवस सणउत्सवांच्या गर्दीने काय परिणाम झाला हे पाहण्यास योग्य कालावधी असल्याचे म्हणणे ही त्यांनी मांडले.

दुसरी लाट शिखरावर असताना एका दिवसात कमाल ११ हजार रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र सध्या लसीकरण आणि कोरोना प्रतिबंधात्मक वर्तणूकीच्या कडक अंमलबजावणीमुळे संभाव्य तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बहुतांश मुंबईकरांनी कोरोनाचा किमान पहिला डोस घेतला असून दुसऱ्या मात्रेचा लाभ घेणारी संख्या ही कमी असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Suresh Kakani) यांनी सांगितले की, सण उत्सवांमध्ये देखील पालिकेने टेस्टची संख्या कमी केली नाही. यातून घटत्या रुग्णसंख्येचा आणि घटत्या सक्रिय रुग्णसंख्येचा अभ्यास करता येणार आहे. दरम्यान पालिकेकडे लसीकरणावर भर देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here