@maharashtracity

असंसर्गजन्य रुग्णांना उपचार सुरु

मुंबई: कोरोना काळात मुंबईतील पालिकेच्या (BMC) वेगवेगळ्या दवाखान्यातील आणि उपनगरीय रुग्णालयांमधील हायपरटेंशन (High BP) आणि मधुमेह (Diabetic) आजारांवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी असल्याचे नोंद सांगते.

मात्र ही रूग्ण संख्या फक्त पालिका दवाखाने आणि उपनगरीय रुग्णालयातील असून पालिका प्रमुख रुग्णालये आणि खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रूग्ण नोंद नाही. तसेच गेल्या दोन वर्षात कोविड (covid) असल्याने रुग्णसेवा कोविड महामारीला समर्पित असल्याने इतर रूग्ण उपचारासाठी फिरकले नसल्याचे एका पालिका आरोग्य विभाग अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, कोरोना महामारीनंतर पालिकेकडे १० हजार ९६७ हायपरटेंशनग्रस्त असलेल्या नवीन रुग्णांची नोंद झाली. तर सरासरी २१ हजार १०३ रुग्ण ओपीडी आणि फॉलोअप उपचारांसाठी उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यात दाखल झाले होते.

यावर्षी जानेवारी ते जून महिन्यात ६ हजार २९८ नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर, सरासरी १९ हजार ४२४ रुग्ण ओपीडीत दर महिन्याला दाखल झाले आहेत. दरम्यान कोविड काळात १० हजार ५४२ नवे मधुमेहाचे रुग्ण आढळले.

दर महिन्याला सरासरी २६,१८० रुग्ण मधुमेहाचे ओपीडीत फॉलोअप आणि उपचारांसाठी दाखल झाले होते. यावर्षी जानेवारी ते जून महिन्यांपर्यंत पालिकेकडे ७ हजारांहून अधिक मधुमेहींची नोंद झाली असून दर महिन्याला २५ हजार ८४८ रुग्णांनी ओपीडीत येऊन उपचार घेतले.

गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत या दोन वर्षांतील मधुमेह आणि हायपरटेंशनच्या रुग्णांची नोंद कमी झाल्याची कारणे कोविड काळात लपलेली असल्याचे आरोग्य अधिकारी सांगतात. असंसर्गजन्य आजाराचे रूग्ण कमी झाले नसून त्यांना शोधून उपचार करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट होत आहे.

यावर बोलताना पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले की, पालिकेच्या नोंदीनुसार हा आकडा फक्त उपनगरीय रुग्णालये आणि दवाखान्यातला आहे. यात प्रमुख रुग्णालयातील आकडेवारी नाही.

कोविड काळात कोविडेतर रुग्णांच्या उपचारांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही नोंद कमी झालेली दिसते. कोविडमुळे लोक घराबाहेर नाही पडले त्यातून त्यांचे निदान ही झाले नाही. पालिका दवाखान्यांमधून आता मधुमेह आणि हायपरटेंशनचे रुग्ण शोधून उपचार दिले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here