@maharashtracity

गर्भवती महिला, लहान मुलांना गर्दी न करण्याचे आवाहन

कोरोना नियमांचे कडक पालन बंधनकारक

मुंबई: मुंबईत कोरोनावर नियंत्रण आल्याने येत्या १ नोव्हेंबरपासून मुंबईकर, पर्यटकांना राणी बागेचे दरवाजे पुन्हा एकदा खुले होणार आहेत. पर्यटकांना वाघांची (tiger) डरकाळी ऐकायला व पक्षांचा किलबिलाट, पाण्यात पोहणारे पेंग्विन (Penguin) बघायला मिळणार आहे. (Tourist allows to visit Ranicha baug)

पर्यटकांना कोरोनासंदर्भातील सर्व नियमांचे पालन कडकपणे करावे लागणार आहे. तिकीट विक्रीच्या वेळेत सव्वा तास कपात करण्यात येणार आहे. तर गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले ( ५ वर्षांखालील) यांनी शक्यतो राणीच्या बागेत भेट देणे टाळावे अथवा गर्दी न करता स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

कोविड – १९ संसर्ग कालावधीत बंद असलेले वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय सोमवार १ नोव्हेंबर २०२१ पासून नियमित वेळेनुसार पर्यटकांसाठी पुन्हा खुले करण्यात येणार आहे. पर्यटकांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तर प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांकरिता सकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत प्राणिसंग्रहालय पुन्‍हा खुले करण्यात येणार आहे.

प्राणिसंग्रहालयातील तिकीट खिडकी सायंकाळी ५.१५ ऐवजी दररोज सायंकाळी ४ वाजता बंद करण्यात येणार आहे. दिवसभरात / सुटीच्‍या दिवशी कोणत्‍याही वेळेस प्राणिसंग्रहालयामध्‍ये जास्‍त प्रमाणात गर्दी झाली असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास कोविड सुरक्षेच्‍या उपाययोजनांमुळे प्राणिसंग्रहालयाचे प्रवेशद्वार पर्यटकांकरिता त्वरित बंद करुन तिकिट विक्री थांबविण्यात येणार आहे.

नागरिकांनी घ्यावयाची दक्षता

१) प्राणिसंग्रहालयात प्रवेश करताना मुखपट्टी (mask) चा वापर अनिवार्य असेल.

२) कोविड विषाणुंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी, तिकीट खिडकीजवळ आखून दिलेल्या जागेवरच रांगेत उभे राहावे, गर्दी करू नये. दोन व्यक्तिंमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे.

३) प्राणिसंग्रहालयात येताना सोबत कमीत-कमी साहित्य आणावे. साहित्य जमा करून ठेवण्याची सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.

४) प्रवेशद्वाराजवळील हात निर्जंतुकीकरण (sanitizer) सुविधेचा उपयोग केल्यानंतरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश करावा.

५) प्राणिसंग्रहालयात प्रवेश केल्यावर गर्दीने / समुहाने फिरू नये. प्रदर्शनीय क्षेत्रात प्राणी पाहण्यासाठी गर्दी करू नये.

६) कोविड विषाणुंचा प्रसार व प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रदर्शनीय क्षेत्रात काचेला अथवा बॅरिकेडला स्पर्श करू नये.

७) प्राणिसंग्रहालयात केरकचरा इतरत्र टाकू नये व थुंकू नये. कचराकुंडीचा वापर करावा.

८) एकवेळ वापराचे (single use mask) मास्क व हातमोजे इतरत्र न फेकता जागोजागी ठेवण्यात आलेल्या विशिष्ट कचऱ्याच्या डब्यात टाकावे.

९) कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्राणिसंग्रहालयातील जवळपासच्या सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधावा.

१०) कोणतेही खाद्यपदार्थ प्राणिसंग्रहालयात आणू नये.

११) प्रसाधनगृहाचा वापर केल्यानंतर प्रसाधनगृहातील साबण द्रावणाचा (liquid soap) उपयोग करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here