@maharashtracity

पहिल्या डोस वाचून वंचित असणाऱ्यांसाठी

लसीकरणाचा आलेख वाढविण्यासाठी लसीकरण ऑन व्हील्स

मुंबई: आता प्रत्येक मुंबईकराला लस देण्यास मुंबई महापालिका (BMC) पुढे सरसावली असून लसीकरण ऑन व्हील (Vaccinantion on Wheel) उपक्रम सोमवार पासून सुरु करण्यात आला. या मोहिमेत सोसायट्या, गर्दीची ठिकाणे सहभागी करण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक मुंबईकराला लस असे उद्दीष्ट्य समोर ठेवण्यात आले आहे. (BMC started Vaccinantion on Wheel)

या मोहिमेअंतर्गत प्रत्येक प्रभागात सोमवारपासून मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले आहे. तसे ते इतर वॉर्डामध्येही सुरू झाले असून उर्वरित वॉर्डात टप्प्याटप्प्याने सुरू केले जाणार असल्याचे पलिकेकडून सांगण्यात आले.

मुंबईत ९७ टक्के लोकांना लसीकरणाचा पहिला डोस मिळाला आहे. मात्र ऑक्टोबरअखेरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना पहिला डोस देण्याचे लक्ष्य पालिकेने ठरवले आहे. हे पूर्ण करण्यासाठी लसीकरण ऑन व्हील्स सुरू करण्यात आले आहे.

याअंतर्गत, सोमवारी जी-उत्तर वाॅर्डात मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले आहे. दादर परिसरातील हाऊसिंग सोसायटी परिसरात या फिरत्या लसीकरण युनिटद्वारे लसीकरण करण्यात आले. लसीचे दुष्परिणाम झाल्यास तत्काळ उपचारासाठी या मोबाईल व्हॅनमध्ये एईएफआयची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

त्याच प्रमाणे अंधेरी-पश्चिम प्रभागातील बेस्ट एसी बसमध्ये मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले आहे. प्रभाग आरोग्य अधिकारी डाॅ. अजित पंपटवार म्हणाले की, या युनिटचा वापर गर्दीच्या भागात, पुलाखालील बेघर, मंदिर परिसरांमध्ये केला जातो.

हे मोबाईल लसीकरण युनिट सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत कार्यरत राहते. लोकांना येथे वाॅक इन सुविधेद्वारे कोरोनाची लस मिळू शकते. आता पर्यंत ४०० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. या लसीकरण युनिटसह एक रुग्णवाहिका देखील उपस्थित आहे. यामुळे दुष्परिणाम झाल्यास रुग्णाला त्वरीत जवळच्या रुग्णालयात दाखल करता येईल.

आगामी काळात हे मोबाईल लसीकरण युनिट महाविद्यालयाबाहेर देखील थांबवले जाणार असल्याची माहिती डाॅ. पंपटवार यांनी दिली. तर आर-दक्षिण वाॅर्डमध्ये सध्या मोबाईल लसीकरण युनिट सुरू करण्यात आले नसले तरी बुधवार आणि शुक्रवारी झोपडपट्टी भागात लसीकरण शिबिरे सुरू केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

लस न मिळालेल्या झोपडपट्टीतील लाभार्थ्यांना शिबिराद्वारे लसीकरण केले जाणार आहे. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की, लसीच्या पहिल्या डोससाठी उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी आणि दुसऱ्या डोसचा आलेख वाढविण्यासाठी लसीकरण ऑन व्हील्स मोहीम सुरू करण्यात आली असल्याचे काकाणी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here