@maharashtracity
घनकचरा व्यवस्थापन आराखडा मनपाच्या विचाराधीन
मुंबई: मुंबई महापालिका (BMC) शहरात दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य पद्ध्तीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘घनकचरा व्यवस्थापन (Solid Waste Management) आराखडा’ तयार करीत आहे. त्यासाठी ‘व्हिजन २०३०’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमाच्या अंतर्गत यापुढे झोपडपट्ट्या (slums) सोसायट्या, कार्यालये आदी ठिकाणी निर्माण होणाऱ्या ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कचऱ्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी अथवा प्रभागातच लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेकडून कचरा व्यवस्थापनावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या
खर्चात मोठी बचत होणार आहे. संपूर्ण मुंबईतील कचरा देवनार (Deonar), कांजूरमार्ग (Kanjurmarg) येथील डंपिंग ग्राउंड (Dumping ground) हे कचरामुक्त होण्यासाठी मदत होणार आहे
‘व्हिजन – २०३०’ अंतर्गत स्वच्छ मुंबईसाठी (Swatch Mumbai) नागरिकांच्या भावना व अपेक्षा जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेद्वारे ऑनलाईन सर्वेक्षणाचा प्रारंभ शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aaditya Thackeray) यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या सर्वेक्षणात नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा व आपली मते मांडावीत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबईत यापूर्वी ९ हजार मे. टन इतका घनकचरा निर्माण होत असे. मात्र, नंतर पालिकेने सोसायट्यांना त्यांच्या इमारतीच्या आवारात तेथील कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक केल्याने व कचऱ्यातील डेब्रिज वेगळे गोळा करून त्याची विल्हेवाट वेगळ्या पद्धतीने लावण्यात येत असल्याने कचऱ्याच्या प्रमाणात मोठी घट झाली.
त्यामुळे आता शहरात दररोज सुमारे ६,५०० मेट्रिक टन घन कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, घरगुती घातक कचरा आणि निष्क्रिय कचरा यांचा समावेश आहे. ‘घन कचरा व्यवस्थापन नियम २०१६’ नुसार कचरा निर्मिती करणाऱ्यांनी या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी केल्यास
घट, कचऱ्यावर स्रोताच्या ठिकाणी प्रक्रिया करणे इ. मार्गाने स्वच्छतेच्या बाबतीत सुधारणा होऊ शकते, असे पालिकेचे म्हणणे आहे.
महापालिकेने घन कचरा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ हा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबई महापालिका आपल्या २४ प्रशासकीय विभागांच्या विविध सामाजिक-आर्थिक रचनेला समजावून घेऊन, शहराला समग्र आणि शाश्वत स्वरुपाच्या कचरा व्यवस्थापनाकडे नेण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याची कार्यवाही करीत आहे.
या अंतर्गत स्रोताच्या ठिकाणी आणि प्रभागातच कचऱ्यावर प्रक्रिया करणे हे अंतिम उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट स्थानिक पातळीला होणार असल्याने कचरा डंपिंग ग्राउंडवर जाणार नाही व डंपिंग ग्राउंड भविष्यात कचराच टाकला जाणार नसल्याने ‘ कचरा मुक्त’ होणार आहे.
हेच पालिकेचे अंतिम उद्दिष्ट आहे.
‘स्वच्छ मुंबई’ विषयक नागरिकांच्या भावना व मते जाणून घेण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन पद्धतीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. भविष्यातील गरजांच्या दृष्टीकोनातून कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेला प्राधान्य देऊन आणि भविष्यात निर्माण होऊ शकणा-या संभाव्य समस्यांवर मात करण्यासह मुंबई महापालिका आपल्या साधनांचा व उपलब्ध जागेचा अधिकाधिक परिणामकारक वापर करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
या सर्वेक्षणामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा आणि ‘व्हिजन २०३०’ अंतर्गत मुंबई महापालिकेला सहभागात्मक अंमलबजावणी आराखडा तयार करण्यास मदत करावी, असे आवाहन महापालिकेद्वारे करण्यात आले आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी “https://mcgm-citizen-survey.cloudstrats.com” या संकेतस्थळावरील प्रश्नांची उत्तरे देऊन सदर सर्वेक्षणामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.