maharashtracity

९ वाढीव नगरसेवकांमुळे अधिकारी, पत्रकारांची गोची होणार

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ( Mumbai Municipal Election) राज्य मंत्रिमंडळाने ( Maharashtra government) वार्ड संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे साहजिकच नगरसेवकांची संख्या ९ ने वाढणार आहे.

मात्र जरी हे २३६ नगरसेवक निवडून आले तरी सध्या पालिका सभागृहात जागेची म्हणजे आसनांची कमतरता दाटीवाटीने सर्वपक्षीय नगरसेवक बसत आहेत.

जिथे सत्ताधारी शिवसेनेचे आदर्शस्थान प्रबोधनकार ठाकरे ( Prabodhankar thackarey) यांच्या आणि भाजपचे आदरणीय नेते अटलबिहारी वाजपेयी ( Atal bihari vajpeyi) यांच्या पुतळ्यांसाठी जागा उपलब्ध होत नाही तेथे या नवीन ९ नगरसेवकांना जागा, आसन व्यवस्था कशी उपलब्ध होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच, मुंबईतून अद्याप कोरोना हद्दपार झालेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष सभा घेण्याबाबत विरोधी पक्ष, पहारेकरी भाजप हे आग्रही असले तरी पुन्हा कोरोना नियम आडवा येणार आहे.

एक आसन रिक्त सोडून सर्वपक्षीय नगरसेवकांना बसावे लागणार आहे. त्यामुळे आणखीनच जागेची अडचण होणार आहे.

जिथे २२७ अधिक ५ नामनिर्देशित नगरसेवकांना म्हणजे एकूण २३२ नगरसेवकांना सध्याची आसन व्यवस्था पुरेशी पडत नाही तेथे २३६ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशित नगरसेवकांना म्हणजे २४१ नगरसेवकांना सभागृहातील आसन व्यवस्था कशी काय पुरेशी ठरणार ?

वास्तविक, खरी कसोटी ही पालिका चिटणीस विभागाची असणार आहे. कारण की, आसन व्यवस्था बघण्याचे काम हे चिटणीस विभागाकडे येते.

राज्य सरकारने ९ वार्ड म्हणजेच आणखीन ९ नगरसेवक वाढविण्याचा निर्णय अगदी सहजपणे घेतला खरा मात्र सरकारने पालिका मुख्यलयातील हेरिटेज सभागृहाचा विचारच केलेला दिसत नाही. तसेच, चिटणीस विभागाचे मत कोणी जाणून घेण्याची तसदीही घेतलेली दिसत नाही.

९ वाढीव नगरसेवकांमुळे अधिकारी, पत्रकारांची गोची होणार

पालिका सभागृह ( Municipal Hall) हे हेरिटेज वास्तू असल्याने त्याची तोडफोड करून अतिरिक्त जागेची व्यवस्था निर्माण करण्यात अडचण येणार आहे.

बरे, सभागृहाबाहेरील मोकळी जागा सभागृहाला जोडून घ्यायची म्हटले तर पिलर त्यात आडवे येणार आहेत. नगरसेवकांना पिलरमुळे कामकाजात भाग घेणे अवघड होणार आहे.

तात्पर्य, वाढीव ९ वार्ड म्हणजेच वाढीव ९ नगरसेवक आणि त्यांच्यासाठी वाढीव आसन व्यवस्था निर्माण करणे हे अवघड जागेवरच दुखणे ठरणार आहे.

जर ९ वार्ड वाढले म्हणजेच आणखीन ९ नगरसेवक वाढले तर पालिका सभागृहात त्यांना बसण्यासाठी जागेची व्यवस्था करणे चिटणीस विभागाला थोडेसे नव्हे खूपच अवघड होणार आहे.

त्यासाठी सध्या काही पत्रकार, अधिकारी आणि साउंड सिस्टीमवाले जेथे बसतात त्या जागा मोकळ्या कराव्या लागतील. तर आणि तरच जागेची व्यवस्था होऊ शकणार आहे. अधिकारी, पत्रकार व साउंड सिस्टीम यांची सभागृहाच्या बाहेरील भागात पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

त्या ठिकाणी प्रोजेक्ट्रवर सभेचे थेट प्रक्षेपण करून अधिकारी, पत्रकार यांना आपले कामकाज करणे शक्य होऊ शकते.

दुसरा पर्याय म्हणजे सभागृहातील दोन गॅलरीमधील जागेचा वापर करून तेथे सभेच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था केल्यास तोही एक वेगळा पण थोडासा अवघड पर्याय होऊ शकतो.

आणखीन एक पर्याय म्हणजे सभागृहात प्रबोधनकार ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांसारख्या महान व्यक्तींच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध होत नसल्याचे कारण पालिका प्रशासनाने दिले तेथे नवीन ९ नगरसेवकांसाठी जादा आसन व्यवस्था कशी निर्माण करता येईल ?

मात्र सभागृहात दोन ठिकाणी राष्ट्रपुरुष, थोर समाजसेवकांचे पुतळे लावण्यात आले आहेत. त्यामुळे जागेची कमतरता भासत आहे. जर हे पुतळे दोन ऐवजी एकाच जागेत जियोजनबद्ध रित्या बसवले गेले तर आणखीन काही जागा उपल्बध होण्याचा पर्याय उपल्बध होऊ शकतो.

मात्र त्या पुतळ्यांच्या विषयाला हात घालायचा कोणी , त्या विषयाला हात घातला आणि त्यावरून काही वादंग निर्माण झाला तर त्यावरून आणखीन वेगळे रामायण, महाभारत घडेल. हा आणखीन मोठा अडचणींचा प्रश्न निर्माण होईल.

तिसर पर्याय म्हणजे नवी मुंबई महापालिकेने वाढते शहरीकरण, वाढती लोकसंख्या, जागेची कमतरता आणि भविष्याची गरज ओळखून नवीन व प्रशस्त पालिका कार्यालय उभारून एक चांगला पायंडा घातला.

मात्र आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेकडे अनेक मोठे भूखंड असतानाही नवी मुंबई महापालिकेप्रमाणे भविष्याचा वेध घेऊन नवीन व प्रशस्त वास्तू उभारणीचा विचार करता आलेला दिसत नाही.

१८७२ पासून नगरसेवक संख्या ६४ वरून २२७ अधिक ५ नामनिर्देशित अशी २३२ वर गेली तरी मोठया व नवीन सभागृहाबाबत ठोस निर्णय घेता आलेला दिसत नाही. भविष्यात नगरसेवक संख्येत आणखीन काही भर पडू शकेल त्यामुळे तर पुढे आणखीनच गोची होणार आहे.

त्यापेक्षा पालिकेने नवीन वास्तू उभारून, प्रशस्त सभागृह उभारणी करून ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावायला पाहिजे.

पालिकेच्या नवीन प्रशासकीय सहा मजली इमारतीवर नव्याने दोन चार मजले चढवून जागा उपलब्ध करणे अथवा विना खांबाचा डोम उभारून सभागृहाची जागा उपलब्ध करणे हा आणखीन एक पर्याय ठरू शकेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here