@maharashtracity

बेस्टची ७ महिन्यात कारवाई

विना तिकीट, अप्रमाणित प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसुली

मुंबई: अगोदरच कोट्यवधी रुपयांनी तोट्यात सुरू असलेल्या बेस्ट परिवहन विभागाच्या तोट्यात भर घालू पाहणाऱ्या १० हजार फुकट्या प्रवाशांकडून बेस्टने गेल्या ७ महिन्यात तब्बल ७ लाख रुपयांची ‘बेस्ट’ दंड वसुली केली आहे. (BEST collected fine from without ticket commuters)

त्यामुळे बेस्टच्या तिजोरीत या दंडात्मक कारवाईमुळे वसुलण्यात आलेल्या ७ लाख रुपयांच्या रकमेची भर पडली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचे निरीक्षक हे बेस्ट बसमधून विना तिकीट अथवा प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त अंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अधूनमधून झाडाझडती घेतात. त्यावेळी फुकट्या प्रवाशांकडून दंड वसुली करण्यात येते.

बेस्टच्या या निरीक्षकांनी, जानेवारी ते जुलै २०२१ या ७ महिन्यात बसगाड्यांमधून, बस स्टॉपवर बसमधून उतरताना प्रवाशांची तपासणी केली असता त्यात १० हजार ६३२ फुकटे प्रवासी निघाले. त्यामुळे बेस्टने या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत ७ लाख ५ हजार ९९२ रुपये एवढी दंड वसुली केली.

मुंबईत सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी अद्यापही सर्वसामान्य नागरिकांना लसीच्या दोन मात्रा घेतल्या असल्यासच मासिक पासवर रेल्वे प्रवास करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.

लसीच्या दोन मात्रा घेतल्या असल्या तरी एकवेळचा एकेरी अथवा परतीचाही प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट देण्यात येत नाही. त्यामुळे नाईलाजाने अनेकजण बेस्ट बसमधूनच प्रवास करतात.

काही नागरिक पैसे वाचविण्यासाठी बेस्ट बसमधून बेधडकपणे विना तिकीट प्रवास करण्याचे धाडस करतात. तर काही प्रवासी तिकिटावरील प्रमाणित अंतरापेक्षाही जास्त अंतराचा प्रवास चुकून करतात तर काही प्रवासी मुद्दाम तसा प्रवास करण्याचे भलतेच धाडस करतात.

बेस्ट निरीक्षकांच्या धाडसत्रात ते सर्व प्रवासी सापडल्यास त्यांची मोजदाद ही फुकट्या प्रवाशांत केली जाते. तसेच, त्यांच्यावर नियमाने कायदेशीर कारवाई करून त्यांच्याकडून दंड रक्कम वसुलण्यात येते.

बेस्ट परिवहन विभागाने जानेवारी ते जुलै २०२१ या ७ महिन्याच्या कालावधीत तपासणी मोहीम राबवून १०,६३२ प्रवासी विना तिकीट आढळल्याने त्यांच्याकडून ७ लाख रुपये रक्कम दंडापोटी वसूल केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here