@maharashtracity

लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका

मुंबई: मुंबई महापालिका (BMC) मुख्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये शुक्रवारी सायंकाळी कामावरून सुटण्याच्या वेळीच अचानकपणे तांत्रिक कारणामुळे २१ मिनिटे बत्ती गुल (power failure) झाली. त्यामुळे लिफ्टमध्ये ६ कर्मचारी अडकले होते.

पालिका सुरक्षा दल व आपत्कालीन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पालिका इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी यांनी युद्धपातळीवर धावपळ करून या सर्व अडकलेल्या कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला.

मुंबई शहर भागात बेस्ट उपक्रमाकडून (BEST Undertaking) वीज पुरवठा करण्यात येतो. यामध्ये, मंत्रालय, विधान भवन, राजभवन, मुंबई महापालिका मुख्यालय आदी ठिकाणी बेस्टकडून वीज पुरवठा करण्यात येतो. बेस्ट उपक्रम शहर भागात अखंडित वीज पुरवठा करते.

बेस्ट व्यतिरिक्त टाटा वीज (TATA power) कंपनीसुद्धा काही व्यावसायिक ग्राहकांना वीज पुरवठा करते. शुक्रवारी पालिका मुख्यालयात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते.

सायंकाळी ५.२३ वाजेच्या सुमारास पालिका मुख्यालयातील नवीन इमारतीच्या ठिकाणी काही तरी मोठा आवाज झाल्याचे काही कर्मचाऱ्यांना ऐकायला मिळाले काही क्षणातच या नवीन सहा मजली इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावरील वीज पुरवठा वगळता तळमजल्यापासून ते इतर सर्व मजल्यावरील बत्ती गुल झाली व अंधार पसरला.

याचा मोठा फटका या इमारतीमधील तळमजल्यावरील प्रेस रूम, जनसंपर्क विभाग, दुसऱ्या मजल्यावरील अतिरिक्त आयुक्त कार्यालय, इतर महत्वाच्या कार्यालयांना बसला.

पालिका कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना कार्यालयाच्या खिडक्या उघडून त्याद्वारे मिळणाऱ्या उजेडात आपले काम उरकावे लागले. तर पत्रकारांनाही आपले काम करण्यात अडचणी निर्माण झाल्या.

Also Read: पालिका सफाई कामगारांच्या जॅकेटवर ‘क्लिनअप’ ऐवजी ‘ सिटी ब्युटी फायर’ नाव

पालिकेत बत्ती गुल झाल्यावर सदर नवीन प्रशासकीय इमारतीमधील सहाव्या, पाचव्या मजल्यावरील ६ कर्मचारी हे दोन लिफ्टमध्ये अडकून पडले. यावेळी, पालिका सुरक्षा दलाच्या जवानांशी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी मोबाईलद्वारे संपर्क साधुन आपत्कालीन मदत मागितल्याचे समजते.

त्यामुळे पालिका सुरक्षा दलाचे अधिकारी, सुरक्षारक्षक, इलेक्ट्रिक विभागाचे कर्मचारी यांनी तात्काळ लिफ्टमध्ये अडकलेल्या कर्मचाऱ्यांची २१ मिनिटांच्या अथक प्रयत्नांने सुखरूप सुटका केली.

खरे तर लिफ्टमध्ये अडकल्याने या कर्मचाऱ्यांच्या मनात काहिशी भीती निर्माण झाली होती. मात्र सुदैवाने पालिका आपत्कालीन विभाग व सुरक्षा दलाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ त्यांना त्या कठीण परिस्थितीत दिलासा देत त्यांची सुखरूप सुटका केली.

तसेच, एका कर्मचाऱ्याला तर आपत्कालीन विभागात नेण्यात येऊन त्यांना पाणी पाजण्यात आले आणि चहा, कॉफीबाबत विचारणाही करण्यात आल्याने त्यास मोठा धीर मिळाला.

पालिका मुख्यालयातील नवीन इमारतीत बेस्टच्या वीज पुरवठा तांत्रिक कारणामुळे खंडित झाल्यावर लगेचच जनरेटर सुरू होऊन आपत्कालीन वीज पुरवठा सुरू होणे अपेक्षित असताना तसे झाले नाही.

त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत होईपर्यंत म्हणजे तब्बल २१ मिनिटे पालिका नवीन इमारतीत अंधार पसरला होता. वास्तविक, काही दिवसांपूर्वीच या जनरेटरचे काम हाती घेण्यात आले होते. तरी बत्ती गुल झाल्यावर जनरेटर लागलीच का सुरू झाले नाहीत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर पत्रकारांनाही आपले काम करण्यात अडचणी निर्माण झाल्या. अखेर २१ मिनिटांनी वीज पुरवठा पूर्ववत झाला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

२२ नोव्हेंबर रोजीसुद्धा बत्ती गुलची घटना

पालिका मुख्यालयातील नवीन प्रशासकीय इमारतीत २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२१ वाजताच्या सुमारास अचानकपणे बत्ती गुल झाल्याची घटना घडली होती. आता पुन्हा चार दिवसांनी बत्ती गुल झाली.

बेस्ट विभाग त्याअंतर्गत येणारा बेस्ट वीज विभाग हा मुंबई महापालिकेचा एक अविभाज्य अंग आहे. त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना सारख्या सारख्या घडणे पालिकेच्या दृष्टीने योग्य नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here